जी 23 हा मोदी आणि शहांचा ट्रॅप, नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका

congress leader nana patole slams Rashtriya Swayamsevak Sangh and bjp

देशातील अनेक ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावरती टीका केली जात आहे. भारत जोडो यात्रेच्या नियोजनासंदर्भात आज दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीसाठी नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी हजेरी लावली. दरम्यान, जी 23 हा मोदी आणि शाहांचा ट्रॅप, असं म्हणत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

जी 23 हा ट्रॅप आहे. खरंतर हा मोदी आणि शाहांचा ट्रॅप आहे. मी राजीनामा दिला त्या दिवशी बंगल्याची लाईट, पाण्याचं कनेक्शन तातडीने कापण्यात आलं. वर्षभरापासून गुलाम नबी आझाद यांना कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना सर्व सेवा पुरवल्या जात आहेत असं, नाना पटोले म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत अशी देशातल्या अनेक नेत्यांची इच्छा असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. तसेच ते होतील असा देखील विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.

कॉंग्रेस पक्षामध्ये लोकशाही आहे. तसेच प्रत्येकाला मत ठरविण्याचा अधिकार आहे. सध्या सत्तेत असलेल्या भाजपामधील लोकशाही संपुष्टात आली आहे. विविध माध्यमांमधून भूमिका मांडल्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे. ज्या नेत्यांना त्यांची भूमिका मांडायची आहे, त्यांनी त्यांची भूमिका पक्ष नेतृत्वाकडे मांडावी, असंही पटोले म्हणाले.


हेही वाचा : महाराष्ट्र पिंजून काढत सरकारविरोधात रान पेटवणार, शरद पवारांची मोठी घोषणा