मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावरून आता विरोधक आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्राला जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांसमवेत विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यामधून राज्यात 15 लाख 98 हजार इतकी रोजगार निमिती होणार असल्याचा विश्वास त्यांनी गुरुवारी (23 जानेवारी) व्यक्त केला. पण आता यामधील अनेक कंपन्या या महाराष्ट्रातीलच असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. तसेच, नाना पटोले यांनी शुक्रवारी (24 जानेवारी) पत्रकार परिषद घेत यातील अनेक कंपन्या या मद्यविक्री करणाऱ्या असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला. (Nana Patole on davos summit 2025 criticized CM Devendra Fadnavis)
हेही वाचा : Sanjay Raut On Shah : शहांना समांतर शिवसेना निर्माण करायची आहे, काय म्हणाले संजय राऊत
“मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या टीमचा खर्च हा सरकारच्या तिजोरीतून केला जातो. तसेच, तो पैसा सामन्यांच्या खिशातूनच जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तब्बल 20 लोकांची टीम गेली होती. महाराष्ट्रामध्ये उद्योग आणण्यासाठी त्यांनी हा खर्च केला त्यात काय वावग नाही. त्याचा विरोध आम्ही करणार नाही. 2018मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच मॅग्नेटिक महाराष्ट्र हा एक अशाप्रकारचा मेळावा मुंबईत घेतला होता. त्यावेळेसही 16 लाख कोटी रुपये महाराष्ट्रासाठी आणले होते, असे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पण हे सर्व पैसे कुठे लागले? याचे उत्तर अजूनही महाराष्ट्राच्या जनतेला मिळालेले नाही” असे म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
“राज्य सरकारने करार केलेल्या कंपन्यांमधील 46 कंपन्या या महाराष्ट्रातील आहेत. फक्त 10 कंपन्या या विदेशातील आहेत. नुकतेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री मुंबईला आले होते आणि ते 6 हजार कोटींची गुंतवणूक मुंबईतून छत्तीसगडला घेऊन गेले. त्यांच्याच पक्षाचे बाजूच्या राज्यातील मुख्यमंत्री मुंबईत येतात आणि त्यांच्याकडे आपले उद्योग घेऊन जातात. यांच्यात दम असेल तर त्यांनी महाराष्ट्रात आल्यानंतर एकनाथ शिंदेच्या काळातील आणि आताचे आणलेल्या उद्योग गुंतवणुकीची श्वेतपत्रिका काढावी, हे आव्हान मी करतो.” अशा इशारा त्यांनी यावेळी दिला.