सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने फडणवीसांचा खोटारडेपणा उघड

ओबीसी आरक्षणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे टीकास्त्र, मध्य प्रदेशातील ओबीसींचे आरक्षण कोणामुळे गेले?

MLC election devendra fadnavis reacts on nana patole nagpur mlc win assurance\

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला दोष देणार्‍या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा खोटारडेपणा उघड झाला असून भाजपच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मारेकरी असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी केली.

मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालायाने आज दिले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना पटोले म्हणाले की, भाजप आणि त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आरक्षणविरोधी आहेत. मंडल आयोगाने ओबीसींना आरक्षण दिले होते. त्यावेळी त्याला विरोध करत भाजपने कमंडल यात्रा काढली होती. केंद्रातील भाजप सरकारने इम्पिरीकल डेटा न दिल्यामुळेच ओबींसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. वारंवार मागणी करूनही केंद्र सरकारने डेटा दिला नाही त्यामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. याला पूर्णपणे केंद्रातील भाजप सरकार जबाबदार आहे.

देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर वारंवार खोटे बोलून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पाच वर्षे सत्तेत असताना आरक्षण वाचविण्यासाठी काहीही केले नाही. भाजपला फक्त ओबीसी समाजाची मते हवी आहेत. ओबीसींनी आरक्षण किंवा शासकीय योजनांचा लाभ द्यायचा नाही. भाजपला खरेच ओबीसी आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारने तात्काळ कार्यवाही करून ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत बहाल करावे, अशी मागणीही पटोले यांनी केली.