नागपूर : भाजपा सरकारच्या काळात मतदारांचे मतदानही सुरक्षित राहिलेले नाही. निवडणूक आयोगाने मतदार याद्यात मोठा घोटाळा केला आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेसाठी जाहीर केलेली मतदार संख्या 9.70 कोटी आहे, तर मोदी सरकारच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्रातील प्रौढ मतदारांची संख्या 9.54 कोटी असल्याचे जाहीर केले आहे. मात्र निवडणूक आयोगाने ही वाढीव संख्या कुठून आणली? मतदानादिवशी संध्याकाळी जाहीर केलेली 58 टक्के मतदान दुसऱ्या दिवशी 66.5 टक्के कसे वाढले? लाडकी बहीण योजनेचा लाभ बांग्लादेशींनी घेतल्याचे सरकार सांगत आहे. तसे विधानसभेला वाढलेले हे मतदार केंद्रातील भाजपा सरकारने बांग्लादेशातून आणले का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे. (Nana Patole questioned again on increased voting in assembly elections)
लोकशाहीचे रक्षण व मतदारांची जागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून राज्यभर आंदोलन करून पत्रकार परिषदा घेतल्या. नागपूर येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मतमोजणीवेळी एक-दोन मतदार वाढले तरी निवडणूक रद्द होते, पण विधानसभेला 60 लाख मतदार वाढले. पण त्यावर निवडणूक आयोग काहीच उत्तर देत नाही. रात्रीच्या अंधारत 76 लाख मते कशी वाढली? याचे उत्तर निवडणूक आयोगाने अजून दिलेले नाही. पण हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची वकिली करत त्यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीसांना ती स्क्रिप्ट नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा निवडणूक आयोगाने दिली होती का? अशी विचारणा पटोले यांनी केली.
हेही वाचा – Chhaava Controversy : असे काहीही खपवून घेणार नाही, छावा चित्रपटाच्या वादावर मंत्री सामंतांची भूमिका
लोकसभा निवडणूक 2019 ते 2024 या पाच वर्षात राज्यात 50 लाख मते वाढली तर लोकसभा निवडणूक 2024 व विधानसभा निवडणूक 2024 या सहा महिन्यात 46 लाख मते वाढली, एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदार वाढले कसे, याचे उत्तर निवडणूक आयोग देत नाही. आता तर निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवरून सर्व डेटाच डिलीट केला आहे. भाजपा निवडणूक आयोगाच्या मतदीने दिवसाढवळ्या लोकशाहीचा गळा घोटत आहे. काँग्रेस पक्ष लोकशाहीच्या रक्षण व निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरोधात रस्त्यावर व न्यायालयीन लढा देत आहे. या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आदी उपस्थित होते.
मतदार जागृतीसाठी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन
दरम्यान, राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत लोकशाहीचे रक्षण व मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाने आज राज्यभर आंदोलन करत नंतर पत्रकार परिषदाही घेतल्या. नागपूरमध्ये प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा सरकार व निवडणूक आयोगावर तोफ डागली. मुंबईत प्रोफेशनल काँग्रेसचे प्रवीण चक्रवर्ती व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यवतमाळमध्ये माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कोल्हापुरात खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून निवेदन देण्यात आले. अहिल्यानगरमध्ये प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. याशिवाय पुणे, सोलापूर, नाशिक, नांदेड, बीड, जालना, लातूर, वाशीम, पैठण, ब्रम्हपुरी सह जिल्हा व तालुका स्तरावर आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा – Prithviraj Chavan : निवडणूक आयोगाने वाढवलेल्या मतदारांमुळे महायुतीचा विजय, चव्हाण यांचा आरोप