घरमहाराष्ट्रविधानसभा अध्यक्षपदासाठी 'या' नावांची चर्चा; काँग्रेसला हवंय उपमुख्यमंत्रीपद

विधानसभा अध्यक्षपदासाठी ‘या’ नावांची चर्चा; काँग्रेसला हवंय उपमुख्यमंत्रीपद

Subscribe

आघाडीसमोर विधानसभा अध्यक्षपदाचा नवा पेच

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी आपल्‍या पदाचा राजीनामा दिला. पटोले यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारसमोर विधानसभा अध्यक्ष निवडीचा नवा पेच निर्माण झाला आहे. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदाची मागणी पुढे आली आहे. ही मागणी मान्य झाली नाही तर काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद कायम राहील. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नावाची चर्चा आहे.

काँग्रेसने दिल्लीतून प्रदेशाध्यक्ष बदलाचा निर्णय घेतल्यानंतर नाना पटोले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पटोले यांनी आज विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. पटोलेंकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्याचे निश्चित झाल्‍याची माहिती सूत्रांनी दिली. आता नवीन विधानसभाध्यक्ष कोण याची चर्चा सुरू झाली आहे. हायकमांडच्या निर्णयानुसार आपण राजीनामा दिला असून पक्ष आता जी जबाबदारी सोपवेल ती आपण पार पाडू, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

- Advertisement -

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येऊन आता सव्वा वर्षाचा कालावधी लोटला आहे. दरम्‍यानच्या काळात कोरोनामुळे सर्व घडामोडी थंडावल्‍या होत्‍या. मात्र कोरोनाचा जोर ओसरू लागल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी मध्यंतरी काँग्रेस मंत्र्यांची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत त्यांची मते जाणून घेतली होती. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे विधिमंडळ पक्षनेते आणि महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदासाठी नवा चेहरा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

विधानसभाध्यक्षपदी कोण?

नाना पटोले यांच्या राजीनाम्‍यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले आहे. हे पद काँग्रेसकडेच राहिल्‍यास ज्‍येष्‍ठ नेते पृथ्‍वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, तसेच सुरेश वरपूडकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्षपदावर आता पुन्हा चर्चा होणार असल्याचे विधान केल्याने हा गुंता वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

सत्ता समतोलासाठी काँग्रेसला हवे उपमुख्यमंत्रिपद

आघाडी सरकारमध्ये दुय्यम स्थान मिळत असल्याची काँग्रेसची तक्रार आहे. त्यामुळे सत्ता समतोल साधण्यासाठी काँग्रेसने उपमुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. काँग्रेसची ही मागणी मान्य झाल्यास विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्याबदल्यात शिवसेनेला काँग्रेससाठी एक मंत्रिपद द्यावे लागेल.

दरम्यान, काँग्रेसच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी एक वर्षापूर्वी अस्तित्वात आली. त्यावेळी सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र बसून जे निर्णय घेतले त्यांची अमलजबजावणी सगळे करत आहोत, असे सांगितले.


हेही वाचा – नाना पटोलेंनी दिला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -