राज्यात उद्रेक करण्याचा भाजपचा प्रयत्न

दुसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्रेक करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी केला. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यावर कायद्याप्रमाणे शासन आणि प्रशासन योग्य ती कारवाई करेल, असेही त्यांनी सांगितले.

Winter Assembly session Nana patole announce assembly speaker choose in this Winter session

दुसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्रेक करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी केला. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यावर कायद्याप्रमाणे शासन आणि प्रशासन योग्य ती कारवाई करेल, असेही त्यांनी सांगितले. सध्या मशिदींवरील भोंगे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून हनुमान चालीसा लावण्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले यांनी भाजपवर टीका केली.

राज्यातील वातावरण बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न राज्य सरकार खपवून घेणार नाही. राज ठाकरे यांनी जर कायद्याचे उल्लंघन केले असेल तर पोलीस त्यांच्यावरही कारवाई करेल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

कोणाच्याही धर्माबद्दल थेट टीका करणे चुकीचे आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचे राज्य असून या विचाराचे रक्षण करण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. सर्वोच्च न्यायालयाने भोंग्यांबाबत जे निर्देश दिले आहेत त्याचे पालन प्रशासन करेल. कायद्याच्या पुढे जाऊन कोणी भूमिका घेत असेल तर ती महाराष्ट्रात चालणार नाही. हा विषय राज ठाकरे या व्यक्तीपुरता मर्यादित नाही. कायदा तोडणारा कोणीही असो त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी काँग्रेसने या विषयांवर चर्चा केली आहे. राज्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याबाबत सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे पटोले म्हणाले.

भाजप राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा दोन वर्षांपासून प्रयत्न करत आहे. यातून महाराष्ट्राची बदनामी होत असून, त्याचा परिणाम गुंतणूक आणि रोजगार निर्मितीवर होत आहे. परिणामी तरुणांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होणार असून, हे सर्व थांबले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न काही लोक करत आहेत. बाहेरच्या राज्यातून तलवारी आणि इतर शस्त्र आणण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेने उघड झाला. धार्मिक विवाद करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. परंतु प्रशासन सतर्क असून, शासन आणि प्रशासन दोघेही राज्यात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न हाणून पाडतील, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.