घरताज्या घडामोडीचंद्रकांत पाटलांना मिरच्या का झोंबल्या?, नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

चंद्रकांत पाटलांना मिरच्या का झोंबल्या?, नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

Subscribe

चंद्रकांत पाटील हे पुण्याचे सेवक आहेत का पुनावालाचे सेवक

राज्यात कोरोना संकट असताना भाजपकडून राजकारण करण्यात येत आहे. राज्यावर आलेल्या संकटाशी एकजूटीने लढायचे सोडून भाजप नेते मात्र महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर टीका करण्याचे काम करत आहे. केंद्र सरकारच्या धोरणावर राहूल गांधींनी टीका केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला आहे. चंद्रकांत पाटील आणि केंद्र सरकार कोरोना लसीच्या नफेखोरीला साथ देऊन मृतांच्या टाळूवरचे लोणी खात आहे असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे. तसेच चंद्रकांत पाटली हे पुण्याचे सेवक आहेत की, पुनावालाचे सेवक आहेत याचे उत्तर द्यावे असेही नाना पटोले यांनी म्हटले आहेत.

केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर ढकलल्यानंतर लस उत्पादित कंपनी सिरमकडून लसींची किंमत जाहीर करण्यात आली आहे. यावरुन राहूल गांधींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. याच्या मिरच्या चंद्रकांत पाटली यांना का झोंबल्या आहेत असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच चंद्रकांत पाटील हे पुण्याचे सेवक आहेत का पुनावालाचे सेवक आहेत याचे उत्तरही त्यांनी द्यावे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

केंद्र सरकार ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करणार असून १८ वर्षांवरील तरुणांचे लसीकरण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे म्हटले आहे. तसेच सीरमकडून पूर्वी खासगी कंपन्यांना कोरोना लस २५० रुपयांना मिळणार होते परंतु केंद्राने धोरण जाहीर केल्यानंतर सीरमने लसीच्या किंमती जाहीर केल्या आहेत. यामध्ये केंद्र सरकारला २०० रुपये प्रति डोस तर राज्य सरकारला ४०० रु प्रति डोस आणि खासगी रुग्णलयांना ६०० रु. प्रति डोस अशी किंमत जाहीर केले आहेत. एकच कंपनी ३ किंमती कशा जाहीर करु शकते असा सवाल करत केंद्र सरकार नफेखोरीला साथ देत असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि देशातील राजकीय नेत्यांनी केला होता. याबाबत राहुल गांधींनी टीका केल्यावर चंद्रकांत पाटलांना मिरच्या का झोंबल्या? चंद्रकांत पाटील यांनी भान ठेवून बोलावे, भाडोत्री ट्रोलप्रमाणे खालच्या स्तरावर जाऊन काँग्रेस नेत्यांबद्दल अपशब्द काढल्यास त्यांना त्यांच्या शब्दात उत्तर दिले जाईल असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील

गेल्या अनेक महिन्यांपासून पुण्याची सीरम इंडिया आपल्या देशातील लोकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी आर्थिक आणि वैद्यकीय जोखीम उचलून लस उत्पादन करत आहे. सीरम इंडियाने आज आपल्या लसीची किंमत पारदर्शकपणे लोकांसमोर ठेवली आहे. आजही ही लस जगातील अन्य सर्व लसींपेक्षा स्वस्त असल्याचे स्पष्ट करतानाच पाटील म्हणाले की, राहुल गांधींची ही भूमिका देशविरोधी आहे. राहुल गांधी हे केवळ काँग्रेसचे नेते नसून देशासाठी खूप मोठा धोका आहे, त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीत जनतेने काँग्रेसला उत्तमरीत्या आपटले आहे. असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -