कुंभकोणी महाधिवक्ता तरीही कोर्टाचे निकाल विरोधात का?, नाना पटोलेंनी केली चौकशीची मागणी

ओबीसी समाज, मराठा समाज तसेच इतर जातींच्या समाजाला आरक्षण भाजपला द्यायचे नाही.

nana patole target advocate general ashutosh kumbhkoni for court failure
कुंभकोणी महाधिवक्ता तरीही कोर्टाचे निकाल विरोधात का?, नाना पटोलेंनी केली चौकशीची मागणी

महाविकास आघाडी सरकार आल्यापासून न्यायालयाचे निर्णय विरोधात येत आहेत. यामुळे राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या भूमिकेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सवाल उपस्थित केला आहे. फडणवीस सरकारच्या काळात महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी होते आताही तेच आहेत मग वारंवार सर्वोच्च न्यायालयाचे निकाल राज्य सरकारच्या विरोधात का येत आहेत? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. कुंभकोणी यांच्या भूमिकेवर संशय येत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. कुंभकोणी यांना महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर का बदलण्यात आले नाही असा प्रश्नही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे महाधिवक्ता कुंभकोणी यांच्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने २०१७ मध्ये एका परिपत्रकाच्या आधारावर नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ दिल्या नव्हत्या त्यावेळी महाधिवक्ता कुंभकोणी होते. आताही कुंभकोणी आहेत. परंतु तरीही न्यायालयाचे निर्णय वारंवार सरकारच्या विरोधात का येताहेत यावर संशय आहे. याबाबत सरकारच्या निदर्शनात आणून देणं आमचे काम आहे.

म्हणून मनात संशय

ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवणे हे आमचं काम आहे. यामुळे संशय व्यक्त केला असून राज्य सरकारने त्याचा तपास केला पाहिजे. नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, ७३ व्या घटनादुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपल्यावर लगेच प्रशासक नेमला जातो यामध्ये एकाही दिवस वाया घालवता येत नाही. परंतु असे असतानाही फडणवीस सरकारने तब्बल २ वर्षे निवडणुका घेतल्या नव्हत्या, त्याचे कारण काय? याबाबत माहिती घेतली पाहिजे. सर्वोच्च न्यायालय वारंवार ओबीसींच्या जागेवर निवडणुका घ्या असे म्हणत आहे. यामुळे मनात संशय निर्माण होत असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

ओबीसी आरक्षणासाठी भाजप जबाबदार

ओबीसी समाज, मराठा समाज तसेच इतर जातींच्या समाजाला आरक्षण भाजपला द्यायचे नाही. ओबीसींवर भाजपने अन्याय केला असून भाजपमुळेच आरक्षण आरक्षण मिळाले नसल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. आरक्षणाच्या बाबतीत भाजप अडचणी आणत आहे. ओबीसी नेत्यांवर आरोप करुन त्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याची काम भाजपकडून करण्यात येत आहेत. काही झारीतले शुक्राचार्य आहेत. तत्कालीन फडणवीस सरकारमध्ये तेच महाधिवक्ता होते आताही तेच आहेत तरी केसचा निकाल विरोधात येत आहे. यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : अपयश झाकण्यासाठी CM नाही PM बदला, काँग्रेसचा भाजपवर निशाणा