मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या विधानसभा उमेदवारांची बैठक टिळक भवन येथे पार पडली. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर आणि चिंताजनक प्रकार असल्याचे म्हटले. तसेच विधानसभा निवडणुकीतील मतांच्या तफावतीसंदर्भात काँग्रेस पक्ष न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढेल, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे. (Nana Patole warns that Congress party will fight a legal and street battle regarding the difference in votes in the assembly elections)
नाना पटोले म्हणाले की, आमच्यासाठी आणि लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे. महाराष्ट्रात आमचं सरकार आलं असतं तरी मी हा प्रश्न उपस्थित केला असता. मला हरण्या जिंकण्यापेक्षा लोकशाही वाचली पाहिजे आणि लोकांच्या मताची ताकद सरकारवर नेहमी राहिली पाहिजे, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. परंतुआज लोकांच्या मताची ताकद सरकारवर नाहीय. भाजपाने महाराष्ट्र विकायला काढलेला आहे. त्यांना जेव्हा कळलं की, लोक आपल्या बाजूने नाहीत, तेव्हा त्यांनी महाराष्ट्र विकायला काढलेला आहे. त्यामुळे आपली लोकशाही धोक्यात आली आहे. अठ्ठ्याहत्तर विधानसभेमध्ये झालेल्या मतदानापेक्षा, काही पटीनं मत वाढल्याचे बातम्यामध्ये आले आहे. मला आमचे प्रतिनिधी आमचे जे उमेदवार काय सांगतात, त्यावर जायचं नाही. निवडणूक आयोगाने राज्यातील मतदानाचा जो पुरावा दिला आहे, तो माझ्या हातात आहे. त्यामुळे माझा निवडणूक आयोगाला प्रश्न आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : मुंबई महानगर पालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार का? राऊत म्हणतात…
नाना पटोले म्हणाले की, मतदानाच्या दिवशी 5 वाजल्यानंतर मतांची टक्केवारी वाढल्याचे प्रमाण पाहता मतदार केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदार संघावर अशा रांगा लागल्या होत्या, ते निवडणूक आयोगाने पुराव्यासह दाखवावे. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर सीसीटिव्ही लावले होते, त्याचे चित्रिकरण दाखवावे. मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असते, ही परंपरा आहे. मात्र यावेळी आयागाने पत्रकार परिषद का घेतली नाही? वाढीव मतांबद्दल देशभरातील विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी शंका उपस्थित केल्या आहेत. यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून राजकीय पक्ष, उमेदवार वा इतरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे, अशी मागणी पटोले यांनी केली.
काँग्रेस पक्ष न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढणार
दरम्यान, नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा पराभव झाला म्हणून नाही तर लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष मतदानाच्या टक्केवारीतील तफावतीचा मुद्दा लावून धरत आहे. भाजपा आणि निवडणूक आयोगाने संगनमताने लोकशाहीची क्रूर थट्टा केली आहे. विधानसभा निवडणुकीतील मतांच्या तफावतीसंदर्भात काँग्रेस पक्ष न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढेल, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.
हेही वाचा – Munde Vs Bawankule : मंत्रिमंडळात नव्यांना संधी अन् प्रदेशाध्यक्षपद पंकजा मुंडेंकडे, भाजपाची नवी रणनीती?