महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडणार? राष्ट्रवादीवरील आरोपानंतर नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य

Nana Patole's suggestive statement Congress leave Mahavikas Aghadi
महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडणार? राष्ट्रवादीवरील आरोपानंतर नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य

राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. या सरकारमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन घटक पक्षंसह मित्र पक्षांचा समावेश आहे. सरकारमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. राष्ट्रावादीने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यानंतर आता नाना पटोलेंनी आघाडीत राहण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी करून राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप नाना पटोले यांनी गेल्या आठवड्यात केला होता. याबाबतची माहिती काँग्रेस नेतृत्वाला दिली असून याबाबत ते निर्णय घेतील असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील परिस्थितीची माहिती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिली असल्याचे सांगितले. यावरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला काही धोका आहे का? असे त्यांना विचारण्यात आले होते. यावर ते म्हणाले की, काहीही होऊ शकते. हा निर्णय काँग्रेस हायकमांडला घ्यायचा आहे. महाराष्ट्रातून काँग्रेसला संपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कोणतीही कसर सोडत नसल्याचा आरोप पटोले यांनी केला. मागील २ वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्याकडे अनेक कार्यकर्त्यांना घेतलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसनं गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपशी हातमिळवणी केली. अमरावतीमध्येसुद्धा पाठीत खंजीर खुपसला आहे. भंडारा येथेही असाच प्रकार घडला. गोंदिया आणि भंडाराबाबत मी स्वतः राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी बोललो, पण त्यांनी सहकार्य केले नसल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. भाजपविरोधात महाविकास आघाडी सरकार करण्यात आले. युती चालवण्यासाठी समान किमान कार्यक्रम तयार करण्यात आला. मात्र मैत्रीच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेससोबत गद्दारी करत आहे. हे आम्हाला मान्य नाही असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

बोलण्यापूर्वी त्यांचा भूतकाळ पाहावा – अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना चांगलाच टोला लगावला आहे. नाना पटोले यांनी बोलण्यापूर्वी आपला भूतकाळ पाहिला पाहिजे. ते पहिले काँग्रेसमध्ये होते. यानतंर ते भाजपमध्ये गेले आणि पुन्हा काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यांनीच भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना मी भाजपची साथ का सोडली हे महाराष्ट्राला माहिती आहे असे सांगितले.


हेही वाचा : राज्यात भोंग्यांवरुन जे काही चाललंय ते मनोरंजन म्हणून पाहा, एकनाथ खडसेंचे वक्तव्य