Homeमहाराष्ट्रNanded : उपचारासाठी लोकांनी तुमच्या निधीची वाट पहायची का? नांदेड मृत्यूतांडव प्रकरणी...

Nanded : उपचारासाठी लोकांनी तुमच्या निधीची वाट पहायची का? नांदेड मृत्यूतांडव प्रकरणी न्यायालयाचा सवाल

Subscribe

मुंबई : वर्ष 2023 मध्ये नांदेडच्या सरकारी रूग्णालयामध्ये फक्त 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरले होते. यामध्ये अनेक नवजात बालक आणि वृद्धांचा मृत्यू झाला होता. यावेळी, त्यांच्या मृत्यूला डॉक्टर किंवा रुग्णालय प्रशासन जबाबदार नसल्याचा अहवाल तपास समितीने दिला होता. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून बुधवारी (5 फेब्रुवारी) मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. “नागरिकांना मुलभूत सुविधा पुरवणं ही राज्य सरकार या नात्यानं तुमची जबाबदारी आहे, सरकारी निधी वेळेत मिळालाच नाही तर तो जाहीर करून उपयोग काय?” असा सवाल यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे. (Nanded government hospital 24 deaths in 24 hours slams maharashtra government)

हेही वाचा : Disha Salian Death Case : माझीही बाजू ऐकून घ्यावी, आदित्य ठाकरेंचा हायकोर्टात अर्ज 

मुंबई उच्च न्यायालय काय म्हणाले?

नांदेडच्या सरकारी रुग्णालयामधील मृत्यूंवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाला सविस्तर भूमिका मांडण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच, लोकांनी उपचारांसाठी तुमच्या निधीची वाट पाहायची का? असाही सवाल न्यायालयाने केला आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये नांदेडमधील विष्णुपुरी येथील डॉ शंकरराव चव्हाण मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या मृत्यूतांडवानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल केली होती. त्यामध्ये दोन दिवसात एकूण 31 मृत्यू झाले होते. त्यावरून न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. मनुष्यबळाची कमतरता हे कारण नांदेड रुग्णालयाबाबत देऊ नका, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

नेमकं घडलं काय ?

नांदेड शहरातील मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 1 ऑक्टोबर 2023 ला एकाच दिवसात 24 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामध्ये 12 नवजात बालकांचा समावेश होता. त्यानंतर दोन दिवसात पुन्हा सात रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये 4 लहान मुलांचा समावेश होता. रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून, वेळेवर औषधे पुरवठा झाला नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. नांदेडच्या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली होती.