नांदेड : नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आलेल्या 50 हुन अधिक भाविकांना विषबाधा झाल्याचे समोर आलेले आहे. भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्याने ही विषबाधा झाल्याचे सांगितले जात आहे. या सर्व भाविकांवर माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून 4 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यामधील सेनगाव तालुक्यातील जवळा येथून एक दिंडी देवदेवेश्वर परिसरात शुक्रवारी (24 जानेवारी) संध्याकाळी दाखल झाली होती. त्यामुळे आता या घटनेचा पोलीस अधिक तपास करत असून 52 जणांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. (Nanded Mahur over 50 devotee suffers from food poisoning)
हेही वाचा : Ajit Pawar : पुण्यात ‘NCP’च्या नेत्यानं एका व्यक्तीला उचलून आपटले, अजितदादा संतापले; थेट फोन केला, पण…
मिळालेल्या माहितीनुसार, माहूर गडावर ठाकूर बुवा यात्रेनिमित्त हजारो भाविक दिंड्याद्वारे माहूर गडावर दाखल होत आहेत. माहूरगडावरील देवदर्शनासाठी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील मौजे जवळा (बु.) येथील जवळपास 200 भाविकांची पायी दिंडी माहूर येथे दर्शनासाठी आली होती. शनिवारी रात्री 8 च्या सुमारास दिंडीमधील भाविकांसाठी त्यांनी फराळासाठी भगर केली होती. ती दिंडीतील जवळपास सर्वच भाविकांनी खाल्ली. पण रात्री 12 वाजल्यानंतर अनेकांना मळमळ तसेच उलटीचा त्रास होऊ लागला. अशामध्ये त्रास झालेल्या भाविकांना मध्यरात्री 2 ते 3च्या सुमारास माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.
समोर आलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय अधिक्षक डॉ. किरण वाघमारे यांच्यासह डॉ. पेदापेल्लीवार, डॉ. वसीम जावेद, डॉ. अंबेकर तसेच त्यांच्या टीमने बाधितांवर उपचार केले. रविवारीदेखील (26 जानेवारी) काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेस मिळालेल्या उपचारानंतर डॉक्टरांनी कोणत्याही रुग्णाला धोका नसल्याचे सांगितले. पण गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात भगरीमुळे होणाऱ्या विषबाधेचा मुद्दा प्रकाशझोतात आला आहे. महाराष्ट्रात एकादशी किंवा उपवासाला भगरीचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते.