दोन-तीन माणसे झोपतील अशी बैठक व्यवस्था, उद्धव ठाकरेंच्या सभेवर राणेंची टीका

narayan rane and uddhav thackeray

मुंबईः दोन तीन माणसे झोपतील अशा खुर्च्या उद्धव ठाकरे यांच्या खेड येथील सभेला लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे गर्दी दिसणारच. मुळात त्यांच्या सभेला स्थानिक नागरिक नव्हतेच. मुंबई, ठाणे येथून माणसे सभेसाठी नेली होती, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आज विधान भवनात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी व्हायची. खेडमध्ये झालेल्या सभेला तेथील स्थानिक नव्हतेच. मुंबई, ठाणे, रायगड येथून माणसे सभेसाठी बोलावली होती. आता उद्धव ठाकरेंमध्ये दम राहिलेला नाही. त्यांच्याकडे बोलण्यासारखे काही नव्हते. जो माणूस अडीच वर्षांत फक्त दोन तास मंत्रालयात होता, त्याच्याकडून काय अपेक्षा करणार. कधी त्यांनी कोकणाला काही दिले नाही. नवीन धोरण नाही. ते काय बोलणार, असा सवाल केंद्रीय मंत्री राणे यांनी उपस्थित केला.

शिवसेना संपली आहे. आता जे काही शिवसेनेत आहेत ते निवडणुकीला त्यांच्यासोबत राहणार नाहीत. त्यांचं नेतृत्त्व कधीच प्रभावी ठरलेलं नाही. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कोणाला साधी कानाखाली नाही मारली. त्यामुळे ज्या वयात काही करायंच होतं तेव्हा त्यांनी काही केलं नाही. आता काही करायंच त्यांचं वय राहिलेलं नाही. परिणामी ते काही करु शकणार नाहीत. पक्षाची वाताहात नाही याताहात झाली आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री राणे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी सभेत जीभ हासडण्याची भाषा केली. त्यावर राणे म्हणाले, आधी स्वतःची जीभ उद्धव ठाकरेंनी सांभाळावी. तसेच आघाडीचा काहीही प्रभाव राहिलेला नाही. लोकांच्या मनातून आघाडी उतरत चालली आहे. निवडणुकीत कोणाचाच काहीही प्रभाव चालणार नाही. माध्यमे उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत असतात. विनाकारण हे कौतुक सुरु आहे. भास्कर जाधव यांनी होळीला केलेला नाच मी पाहिला. हे शोभनीय नाही. त्यांचाही कोणताही प्रभाव जनतेवर नाही, असा टोलाही केंद्रीय मंत्री राणे यांनी हाणला.