Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राणे-ठाकरे येणार एकाच मंचावर; सिंधुदुर्गात ऑक्टोबरमध्ये रंगणार राजकीय दशावतार?

राणे-ठाकरे येणार एकाच मंचावर; सिंधुदुर्गात ऑक्टोबरमध्ये रंगणार राजकीय दशावतार?

Related Story

- Advertisement -

सिंधुदुर्गातील बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचं उद्घाटन येत्या ९ ऑक्टोबरला होणार आहे. केंद्रीय नागरी विमान मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता ऑक्टोबरमध्ये राणे-ठाकरे एकाच मंचावर येणार असल्याने साऱ्यांचं लक्ष त्याकडे लागून राहिलं आहे.

नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत चिपी विमानतळाच्या उद्धाटनाची तारीख जाहीर केली. यावेळी त्यांना या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलावणार का? असा प्रश्‍न नारायण राणे यांना विचारले असता त्यांनी ‘उद्घाटनाला मुख्यमंत्री पाहिजेतच असं नाही’ असं उत्तर दिलं. यानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं.

- Advertisement -

सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यात चिपी विमानतळाच्या उद्धाटनाच्या श्रेयाची लढाई सुरु आहे. नारायण राणे यांनी आपल्या प्रयत्नामुळे चिपी विमानतळ सुरु होत असल्याचा दावा केला. यावर विनायक राऊत यांनी पलटवार केला. आयत्या बिळावर नागोबा होऊन राणेंना विमानतळाचं श्रेय घेता येणार नाही, अशी सरळ टीका विनायक राऊत यांनी राणेंवर केली.

राजशिष्टाचाराचे नियम काय?

या विमानतळाचं उद्घाटन जरी केंद्र सरकारकडून होत असेल, तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना औपचारिक पत्र पाठवावं लागतं. निमंत्रण पत्रिकेतही राज्याचे मुख्यमंत्री, स्थानिक खासदार आणि आमदारांचे नाव असावं लागतं. मुख्यमंत्री आणि इतर नेते कार्यक्रमाला उपस्थित राहतील की नाही हा त्यांचा प्रश्न असतो.

- Advertisement -

केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना बोलावणं बंधनकारक नाही आहे. एखाद्या कार्यक्रमाला जर पंतप्रधान किंवा राष्ट्रपती येत असतील तर मात्र मुख्यमंत्र्यांना बोलावणं बंधनकारक आहे.

कसा आहे कार्यक्रम?

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं बांधकाम २०१४ साली झालं होतं. मात्र, डीजीसीए आणि विमानतळ प्राधिकरणकडून काही दुरुस्त्या सूचवण्यात आल्या होत्या. याशिवाय, केंद्राकडून देखील काही परवानग्या बाकी होत्या.

या सगळ्या परवानग्या घेतल्यानंतर विमानतळावर ‘ट्रायल’ घेण्यात आली. या ट्रायलनंतर हे विमानतळ वाहतूकीसाठी पूर्णपणे तयार असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं.

दरम्यान, नारायण राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार ९ ऑक्टोबरला १२.३० वाजता चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. केंद्रीय नागरी विमान मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, स्थानिक खासदार आणि आमदारही उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच ठाकरे आणि राणे आमनेसामने येणार आहेत.


हेही वाचा – आयत्या बिळावर नागोबा होऊन राणेंना विमानतळाचं श्रेय घेता येणार नाही – विनायक राऊत


 

- Advertisement -