घरताज्या घडामोडीकोकणाला केंद्र सरकारकडून मदत, बचावकार्यासाठी टीम पाठवणार असल्याची नारायण राणे यांची माहिती

कोकणाला केंद्र सरकारकडून मदत, बचावकार्यासाठी टीम पाठवणार असल्याची नारायण राणे यांची माहिती

Subscribe

सगळी व्यवस्था हेलिकॉप्टर किंवा बोटी किंवा अन्य लागणारी मदत करतो असे आश्वासन केंद्रीय मंत्री नित्यानंद यांनी दिलं

राज्यात मागील दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावे, शहरे आणि घरे पाण्याखाली गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांना अन्न पाण्याची व्यवस्था होत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच केंद्र सरकारकडून कोकणातील नागरिकांना योग्य मदत पुरवण्याचे आश्वासन नारायण राणे यांनी दिले आहे. बचावकार्यासाठी आवश्यक टीम पाठवणार असल्याचेही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. तसेच राज्य सरकारने तात्काळ नागरिकांसाठी योग्य मदत पुरवली पाहिजे असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत कोकणातील नागरिकांना केंद्र सरकारकडून मदत देणार असल्याची माहिती दिली आहे. नारायण राणे यांनी म्हटलय की, अतिशय गंभीर परिस्थिती या अतिवृष्टीमुळे निर्माण झाली आहे. राज्यात जवळपास ३५० मिली पाऊस पडलेला आहे. यावर उपाय आहे की, त्या ठिकाणी हेलकॉप्टरने लोकांना काढणे, बोटीने काढणे, योग्य जागी नागरिकांना पोहचवून त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था सरकारने करायला पाहिजे.

- Advertisement -

केंद्र सरकारकडून मदत पुरवणार

मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्याशी संवाद साधला आहे. त्वरित सगळी व्यवस्था हेलिकॉप्टर किंवा बोटी किंवा अन्य लागणारी मदत करतो असे आश्वासन केंद्रीय मंत्री नित्यानंद यांनी दिलं आहे अशी माहिती राणेंनी दिली. तसेच दुसरे मंत्री यादव यांच्याशी बोललो असून वेळ पडली तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलेल परंतु संबंधित मंत्र्यांशी बोलणं झाले असून मदत करण्याचे आश्वासन या मंत्र्यांकडून करण्यात आले आहे. अशी माहिती नारायण राणे यांनी दिली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला

रत्नागिरी आणि सिंधुदूर्गाच्या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांशी नारायण राणे यांनी संवाद साधला आहे. या दोन्ही कलेक्टरसोबत संपर्क केल्यानंतरच केंद्रीय मंत्री नित्यानंद यांच्याशी संवाद साधून मदतीची मागणी केली आहे. यावर त्यांनी संपुर्ण मदतीची शाश्वती दिली असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

अचानक ३०० मिली पाऊस होईल का?

राज्य सरकारकडून अचानक ३०० मिली पाऊस पडला असल्याचे सांगितले जात आहे. यावर नारायण राणे यांनी म्हटलं आहे की, अचानक ३०० मिली पाऊस पडू शकत नाही ४८ तासांचा पाऊस आहे. दोन दिवसांचा पाऊस आहे जर अचानक पाऊस पडला तर खाली माणूस राहणार नाही. राज्य सरकारला गांभीर्या आहे का? असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे. तर पाऊस सुरु झाल्यावर अतिवृष्टीमुळे कोकणातील नागरिकांचा जीव धोक्यात येतो याचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने पहिल्याच बोटी तयार ठेवल्या पाहिजे होत्या, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माणुसकी आहे का? हा प्रश्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गाडी चालवत विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले पंरतु चेंबूरमध्ये मृत पावलेल्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यास गेले नाही अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -