नारायण राणेंची वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं; शिवसेना नेत्यांचा हल्लाबोल

Narayan Rane needs a medical examination says shivsena

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणात नारायण राणे यांच्यासह भाजपचा चांगलाच समाचार घेतला. यानंतर भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. यावर आता शिवसेना नेत्यांनी हल्लाबोल केला आहे. नारायण राणेंनी राज्याच्या मुख्यमंत्र्याचा एकेरी उल्लेख करणं चूकिचं आहे. इतकच नाही तर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं आहे. नारायण राणे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेतील हावभाव पाहता त्यांची मेडिकल तपासणी करण्याची गरज असल्याचा खोचक टोला कृषी मंत्री दादा भुसे यांनी लगावला आहे.

कृषी मंत्री दादा भुसे यांनी नारायण राणेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं. नारायण राणे यांचा इतिहास आणि भूगोल सगळ्यांनाच माहित आहे. त्यांचे पत्रकार परिषदेतले हावभाव आणि बोलणं बघता त्यांची वैद्यकीय तपासणी करणं आवश्यक आहे असं दादा भुसे यांनी म्हटलं. नारायण राणे यांचं वय आणि आदित्य ठाकरेंचं वय यामध्ये खूप अंतर आहे. तरीही नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंकडून संयम कसा बाळगावा हे शिकायला हवं, असा टोला दादा भुसे यांनी लगावला.

नारायण राणेंवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी टोला लगावला. तर शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी नारायण राणेंवर जोरदार प्रहार केला. वाल्मिकी नारायण राणेंचा पुन्हा वाल्या झाला, अशी टीका अर्जुन खोतकर यांनी केली. नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेवून मुख्यमंत्र्यांविषयी अर्वाच्य भाषेत टीका केली. शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसणारा हा राणे आहे. त्यामुळे ज्याच्या मनातच पाप आहे त्याच्याकडून चांगल्या भाषेची अपेक्षा काय करणार. अशा शब्दात अर्जुन खोतकर यांनी राणेंचा समाचार घेतला.