उद्धव ठाकरे रागावले, पण…, नारायण राणे यांची खोचक टीका

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर रागावल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले की, राजनाथ सिंह यांच्याशी फोनवर बोलताना उद्धव ठाकरे घरात होते. ते रागवल्याचं त्यांच्या पत्नीने पाहिलं असेल. परंतु इतर कुणीही बघितले नाही, अशी खोचक टीका नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

नारायण राणे हे नवी मुंबईतील एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे राजनाथ सिंह यांच्यावर भडकण्याबाबत जे बोलले ते फोनवरील संभाषण आहे. फोनवर बोलताना उद्धव ठाकरे घरीच होते. ते राजनाथ सिंह यांच्यावर रागावल्याचं त्यांच्या पत्नीनेच पाहिलं असेल. इतर कुणीही ते रागावल्याचं पाहिलं नाही. ते स्वत: सांगत आहेत की मी रागावलो होतो. उद्धव ठाकरेंनी रागवावं असे त्यांचे दिवस राहिले नाहीत. काय वाईट परिस्थिती आली आहे. त्यांना हात जोडत फिरावं लागत आहे, असाही खोचक टोला देखील राणेंनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला होता. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी फोनवर मला अस्सलाम वालेकुम म्हणून बोलण्यास सुरुवात केली. त्यांची ही भाषा ऐकून मला धक्का बसला. त्यांच्या या कृत्यावर मी संतापल्यानंतर ते जय श्रीराम म्हणाले, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, शिवसेना एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार आहे. मात्र, द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पक्षातून नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.


हेही वाचा : ठाण्यात पावसाची जोरदार बॅटींग, रेल्वे वाहतूक विस्कळीत