शिवसेनेत असताना मी संजय राऊतचा बाप होतो – नारायण राणे

narayan rane and sanjay raut
नारायण राणे यांची संजय राऊत यांच्यावर टीका

शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. इंदिरा गांधी यांच्यावरील टिप्पणीनंतर काँग्रेस तर छत्रपतींच्या वशंजावर केलेल्या भाष्यानंतर भाजपचे नेते संजय राऊत यांच्यावर तुटून पडले आहे. भाजपचे खासदार नारायण राणे यांनी देखील आज पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. “मी दाऊदशी बोलायचो, त्याला दमही दिला”, असे राऊत म्हणाले होते. तुम्ही शिवसेनेत असताना संजय राऊत यांनी दाऊदच्या भेटीबद्दल काही सांगितले होते का? असा प्रश्न पत्रकारांनी राणे यांना विचारला असता ते म्हणाले की, “शिवसेनेत असताना मी संजय राऊतचा बाप होतो. माझ्याजवळ राऊत फिरकायचा देखील नाही.”

नारायण राणे यांनी राऊत यांच्या वक्तव्याचा आज चांगलाच समाचार घेतला. “संजय राऊत यांना सत्तेचा माज चढला आहे, त्यामुळेच त्यांची जीभ जास्त चालायला लागली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात स्वतःच्या भावाला मंत्रिपद मिळाले नाही, त्यानंतर त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसत आहे. छत्रपतींच्या वशंजाबद्दल काय बोललात तर जीभ जागेवर राहणार नाही, एवढाच इशारा आज आम्ही देत असल्याचे राणे म्हणाले.

छत्रपतींच्या वशंजांना पुरावे मागणारे संजय राऊत कोण आहेत? असाही प्रश्न राणे यांनी उपस्थित केला. भाजप आणि मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी शांत बसणार नाही. राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने काम करावे, मात्र वशंजावर बोलू नये. इंदिरा गांधीबद्दलही राऊत यांनी भाष्य केले आहे. त्यानंतर त्यांनी आपले वक्तव्य मागे घेतले असले तरी त्यांचे वक्तव्य रेकॉर्डवरुन जाणार नाही. इंदिरा गांधींनी करीम लालाची भेट घेतल्याचे वक्तव्य केल्यानंतरही काँग्रेसवाले कसे शांत बसले? याचाच मला प्रश्न पडला असल्याचे राणे म्हणाले.

राणे पुढे म्हणाले की, “मला तर संशय येतो. उद्धव ठाकरेंना जे बोलायचे आहे, ते संजय राऊत यांच्या तोंडून बोलत आहेत. तसे नसते तर त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाष्य केले असते. छत्रपतींच्या वशंजावर बोलल्यानिमित्त राऊत यांना माफी मागायला लावली असती.”