Narayan Rane : संजय राऊतांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर?; नारायण राणेंचा सवाल

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर दोन दिवसांपूर्वी टाच आणली होती. यावेळी संजय राऊत हे अधिवेशनासाठी दिल्लीमध्ये होते. मात्र, ईडीने केलेल्या कारवाईनंतर संजय राऊत हे आज मुंबईत दाखल झाले आहेत. राऊत मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांचं शिवसैनिकांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. दरम्यान, संजय राऊतांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर?, असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत विचारला आहे.

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?? काळा पैसा मिळवायचाय, अन् कारवाई झाली की बोंबलायचं.. त्यानंतर केलेली पापं झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन करायचं. यातून जनतेने काय बोध घ्यावा? संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर?, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने मोठी कारवाई करत राऊतांची अलिबाग आणि मुंबईतील दादर येथील संपत्ती जप्त केली आहे. संजय राऊत मुंबई विमान तळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

भाजपा नेते किरीट सोमय्यांचा भ्रष्टाचार पुराव्यासह बाहेर काढला. सोमय्यांकडे आता उत्तर असूच शकत नाही, म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केला हे स्पष्ट असल्याचं राऊत म्हणाले. सोमय्यांच्या विक्रांत घोटाळ्यावर आता देशात चर्चा सुरू झाली आहे. विक्रांतसाठी मिळवलेल्या पैशातून सोमय्यांनी मनी लाँड्रिंग केलं, असं संजय राऊत म्हणाले. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत.


हेही वाचा : खासदार संजय राऊतांचं मुंबई विमानतळावर जंगी स्वागत, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना