Homeमहाराष्ट्रमराठवाडाNarendra Chapalgaonkar Passed Away : ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचे निधन

Narendra Chapalgaonkar Passed Away : ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचे निधन

Subscribe

आपल्या लेखणीतून विचार मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत तसेच माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन झाले आहे. शनिवारी (ता. 25 जानेवारी) पहाटे 04 वाजता चपळगावकर यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 88 वर्षाचे होते.

छत्रपती संभाजीनगर : देशाची राजकीय स्थिती यामध्ये हैदराबाद संस्थानातील मराठवाडा समजून घेऊन या भागाचा इतिहास, सामाजिक, राजकीय वास्तव आपल्या लेखनातून मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत तसेच माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन झाले आहे. शनिवारी (ता. 25 जानेवारी) पहाटे 04 वाजता चपळगावकर यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 88 वर्षाचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. ज्यामुळे त्यांच्यावर संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, त्यांच्या जाण्याने साहित्यिक विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे. (Narendra Chapalgaonkar Former Justice passed away at the age of 88)

चपळगावकर यांची न्यायालयीन कारकीर्द

माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या न्यायालयीन कारकीर्दीत 1962 ते 1978 या काळात बीड येथे वकिली केली. त्यानंतर 1981 पासून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायाधीश म्हणून काम केले. 28 वर्षे वकिली व्यवसाय केल्यानंतर 19 जानेवारी 1990 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी त्यांची निवड झाली. 1999 मध्ये निवृत्त झाल्यानंतर चपळगावकर यांनी सामाजिक, वैचारिक, आणि साहित्यिक क्षेत्रांत आपले काम सुरू ठेवले. मराठवाड्यातील साहित्य आणि वाड्मयीन विश्वाला वळण देण्यात न्यायमूर्ती चपळगावकरांचा मोठा वाटा राहिला.

हेही वाचा… Ramabai Ranade : स्त्री हक्काच्या पुरस्कर्त्या रमाबाई रानडे

साहित्यिक म्हणून केलेले काम…

माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे उत्कृष्ट साहित्यिक होते. न्यायमूर्ती पदावरून निवृत्त झाल्यानंतर चपळगावकर यांनी मराठी साहित्य विश्वात मोठे योगदान दिले. त्यांनी तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ,” “कायदा आणि माणूस,” आणि “मनातली माणसं” यांसारखे दर्जेदार साहित्य लिहिले आहे. राजहंसचा ‘श्री. ग. माजगावकर स्मृती’ हा वैचारिक लेखनासाठी पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे जीवन गौरव पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेचा दिलीप चित्रे स्मृती पुरस्कार आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा राम शेवाळकर स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. नरेंद्र चपळगावकर हे वर्धा येथील 96 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आपल्या लिखाणातून भारतीय स्वातंत्र्याचा काळ आणि नेतृत्व या विषयीचे त्यांचे चिंतन प्रेरणादायी मानले जाते. नरेंद्र चपळगावकर यांची एकूण 36 पुस्तके प्रकाशित झाली होती.