राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. 230 जागा घेत महायुतीच्या वादळाने महाविकास आघाडीला भुईसपाट केलं आहे. मात्र, सत्तेत येताच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून ओढाताण सुरू झाली आहे. ‘बिहार पॅटर्न’नुसार एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेकडून होत आहे.
‘बिहार पॅटर्न’ काय?
नितीश कुमार आणि भाजपनं एकत्रित रित्या विधानसभा निवडणूक लढली होती. मात्र, विधानसभेला नितीश कुमार यांच्या पक्षाच्या कमी जागा आल्यानंतरही भाजपनं त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. हाच बिहार पॅटर्न राज्यातही लागू करून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री केलं जावं, असं शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : ‘गद्दार’ अन् ‘पाडा-पाडा’ केलेलं आवाहन, आता निवडून येताच वळसे-पाटील शरद पवारांच्या भेटीला
नरेश म्हस्के म्हणाले, “भाजपनं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून संजय राऊत यांच्यासारख्या लोकांना उत्तर दिलं पाहिजे. संजय राऊत म्हणतात की, ‘भाजप त्यांच्या मित्रपक्षांचं वापर करून फेकून देते.’ एकनाथ शिंदे यांना भाजपनं मुख्यमंत्री बनवून अशा नरेटिव्हला उत्तर दिलं पाहिजे.”
“बिहारमध्ये ‘एनडीए’नं नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना निवडणुकीत कमी जागा मिळाल्या होत्या. तरीही, नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं. असं महाराष्ट्रात का होत नाही?” असा सवाल नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला आहे.
तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं, “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असं भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतं. तीनही पक्षांच्या नेत्यांना त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावं, असं वाटत आहे. मात्र, याचा निर्णय वरिष्ठ घेतली.”
हेही वाचा : “बारामती लढली नसती, तर वेगळा संदेश गेला असता”, शरद पवारांच्या विधानावर अजितदादा म्हणाले, “माझ्या भावाच्या…”