ठाणे : दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट गेल्या वर्षी आला होता. प्रेक्षकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिल्यामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक कोटी रुपयांची कमाई करत नवीन विक्रम देखील केला. पहिल्या भागात धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना चित्रपटातून दाखवण्यात आल्या होत्या. धर्मवीरच्या भरघोस यशानंतर धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची चांगलीच चर्चा रंगली होती. दरम्यान ही चर्चा आता प्रत्यक्षात उतरण्यास सज्ज झाली आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात मुहूर्त संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरे गटावर निशाणा साधला. तर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आनंद दिघे यांना कोणामुळे टाडा लागला, याबाबत गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी देखील ठाकरे गटावर आणि विशेषतः ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Naresh Mhaske’s secret explosion regarding the scandal of Anand Dighe)
हेही वाचा – “धर्मवीर २” च्या चित्रीकरणाला ९ डिसेंबरपासून सुरुवात होणार
यावेळी बोलतना नरेश म्हस्के म्हणाले की, आज पहिल्यांदा संजय राऊत अर्धसत्य बोलले आहेत. पहिल्या पार्टमध्ये काही बंधने होती, त्या बंधनांमुळे धर्मवीर आनंद दिघेंना संजय राऊत आणि मंडळी कसा त्रास द्यायची, कशा पद्धतीने ते दिघेंचा दुस्वास करायचे, कशा पद्धतीने दिघेंचे खच्चीकरण करायचे ते दाखविता आले नव्हते. यामुळे आजच्या वक्तव्यावर संजय राऊतांचे अभिनंदन करतो. दिघे गेल्यानंतर एकच प्रश्न विचारला गेला की त्यांची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे आणि हे यामध्ये समोर येणार आहे. पहिल्या पार्टमध्ये बंधने होती. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमुळे दिघेंना जो टाडा लागला तो केवळ राऊतांच्या लोकप्रभातील लेखामुळे लागला, ते या चित्रपटाच्या माध्यमातून समोर येईल, असा गौप्यस्फोटही म्हस्के यांच्याकडून करण्यात आला.
तसेच, राऊत यांनी दिघेंचा दुस्वास केला. पहिल्या पार्टमध्ये मातोश्रीने केलेला दुस्वास दाखविता आला नाही. ते दाखविण्याची राऊतांची इच्छा नसावी. संजय राऊतांनी शिवसेना संपविण्याची शरद पवारांकडून सुपारी घेतलेली आहे. ते काम ते चोखपणे पार पाडत आहेत, असा टोला लगावत नरेश म्हस्के म्हणाले की, दिघे साहेबांचे आत्मचरित्र लोकांसमोर आणने हा राजकीय स्वार्थ नाही तर सामाजिक स्वार्थ आहे. येणाऱ्या पिढीला दिघे कळावेत हा त्यामागचा उद्देश आहे. तसेच जे लोक आंदोलनामध्ये पकडले जात आहेत. त्यात शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांची व मंत्र्यांची माणसे सापडत आहेत. याबद्दल सुप्रिया सुळे यांनी प्रथम स्पष्टीकरण द्यावे, असे नरेश म्हस्के यांच्याकडून सांगण्यात आले.