मुंबई : महिन्याभरापूर्वी म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ज्यानंतर राजकारणातील सर्वच नेत्यांच्याबाबतीत पोलिसांनी गांभीर्याने दखल घेण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असल्याने पोलिसांवर राजकीय नेत्यांची मोठी जबाबदारी आहे. अशातच काँग्रेस नेते नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली आढळून आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले असून नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून याबाबचतची विशेष खबरदारी घेतली जात आहे. (Naseem Khan Suspicious activities outside Congress leader office)
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते, चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नसीम खान यांच्याबाबत गेल्या आठवड्याभरापासून रेकी करण्यात येत आहे. बुधवारी (ता. 20 नोव्हेंबर) मतदानाच्या दिवशी दोन संशयित नसीम खान यांचा पाठलाग करत होते. परंतु, या दोघांपैकी एकाने आधीच पवई हिरानंदानी भागातील नसीम खान यांच्या कार्यकर्त्याला त्यांच्याबाबत विचारणा केली होती. ज्यानंतर हे दोघेही गुरुवारी दुपारी नसीम खान यांच्या कार्यालयात पोहोचले, तेथे त्यांच्यापैकी एकाने नसीम खानच्या अंगरक्षकाची चौकशी केली. नसीम खान यांना भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा… Sanjay Raut : महायुतीकडून अपक्षांना पैशांची ऑफर याचा अर्थ… राऊतांचा दावा
काँग्रेस नेते नसीम खान यांची रेकी केल्याप्रकरणी ज्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांच्या मोबाइलमध्ये नसीम खान यांच्याशी संबधित काही आक्षेपार्ह चॅटही आढळले होते. त्यामुळे या घटनेला गांभीर्याने घेत आता मुंबई पोलिसांकडून नसीम खान यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाजवळ पोलिसांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता नसीम खान यांच्याबाबत मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर आले असून त्यांनी खान यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.