पैसा आणि सत्तेसाठी बाप बदलणारी अवलाद…; ठाकरे गटात प्रवेश करताच अद्वय हिरेंची भाजपावर टीका

nashik bjp leader advay hire join shiv sena uddhav thackeray group and attack bjp shinde fadanvis govt

नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, भाजपा नेते अद्वय हिरे यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात अद्वय हिरे यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. यावेळी खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत उपस्थित होते. या पक्षप्रवेशावेळी बोलताना अद्वय हिरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका केली आहे.

कालपासून भाजपाला माझी अचानक आठवण आली, प्रदेशाध्यक्षांपासून सर्वांचे फोन आले. त्यांना स्पष्टपणे म्हटलं की, कितीही खोके, कितीही सत्ता दिली तरी उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द मोडणार नाही. पैसा आणि सत्तेसाठी बाप बदलणारी अवलाद माझी नाही. उत्तर महाराष्ट्रात शिवसेना पक्ष उभा राहण्यासाठी काम करु. येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरेंना बसल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास अद्वय हिरे यांनी व्यक्त केला.

कोणत्याही व्यक्तीगत पदासाठी भाजपाकडे मागणी केली नाही. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली, तेव्हा आंदोलन केलं. पण, भाजपा सरकारने शेतकऱ्याला मरु दिलं. त्यामुळे भाजपचा त्याग केला, असंही अद्वय हिरे म्हणाले.

2009 साली स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभेची जागा निवडून देण्याची विनंती केली. तेव्हापासून मी भाजपाबरोबर काम करत आहे. भाजपमध्ये गेल्यावर सर्वजण पक्ष सोडून गेले होते. देशात सोनिया गांधींना पंतप्रधान करण्याची लाट होती. अशा परिस्थितीत मंत्र्याला लोकसभेत पाडून भाजपचा उमेदवार निवडून आणला. सरपंच, जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आणली. पण आता 50 गद्दार भाजपच्या मांडीवर बसल्यापासून त्यांना आमची गरज राहिली नाही, अशा शब्दात हिरेंनी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला आहे.

शिवसेना सोडून लोकं निघून जात असल्याचा गैरसमज आहे. गेलेल्या गद्दारांना जनता धडा शिकवणार आहे, मी बाहेर पडलोय, 49 मतदारसंघातील भाजपाचे नेते बाहेर पडण्यासाठी थांबले आहेत. तिथे त्यांची कुचंबना होत आहे. निवडणुका जाहीर झाल्यावर 49 मतदारसंघातून हे लोक शिवसेनेत प्रवेश करतील असा दावाही हिरे यांनी केला आहे.


बरं झालं गद्दार गेले, त्यांच्यामुळे हिरे सापडले; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला