Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमनाशिक शहर पोलिसांची मोठी कारवाई; अलर्ट कॉल येताच पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग, दरोडेखोरांकडून...

नाशिक शहर पोलिसांची मोठी कारवाई; अलर्ट कॉल येताच पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग, दरोडेखोरांकडून घातक शस्त्रे, मिरची पूड जप्त

Subscribe

नाशिक शहरात दोन दिवसांपासून जबरी लूट करुन कारमधून फिरुन नागरिकांमध्ये भीती निर्माण करणार्‍या आठ दरोडेखोरांची ओळख पटवण्यात नाशिक शहर पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे, अलर्ट कॉल मिळताच उपनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून तीन जणांच्या मुसक्या आवळल्या असून, पाच दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पोलिसांनी तिघांच्या ताब्यातून गावठी कट्टा व दरोड टाकण्यासाठी लागणारे घातक शस्त्रे, दोरी, मिरची पूड जप्त केली. आठही दरोडेखोर सराईत गुन्हेगार असून, तडीपार व खंडणीखोर असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. तपासातून आणखी जबरी लूट व दरोड्याचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (Nashik city police major action; Cinestyle police chase after alert call, deadly chilli powder, weapons seized from robbers)

स्वप्निल ऊर्फ भूषण सुनील गोसावी (वय २३, रा. टाऊनशिप ओझर, नाशिक), दानिश हबीब शेख (२३, रा. विहितगाव, नाशिकरोड), बबलू रामधर यादव (वय २१, रा. सुंदरनगर, देवळाली गाव), सागर म्हस्के, तुषार पाईकराव, सूरज भालेराव, अनिकेत ऊर्फ शबर्‍या देवरे, रोहित लोंढे ऊर्फ भुर्‍या अशी संशयित दरोडेखोरांची नावे आहेत. गोसावी, शेख व यादव यांना पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

कारच्या काचा फोडून ७० वर्षीय वृद्धावर हल्ला

रोचनदास चोहितराम सचदेव (७०, रा. देवळाली कॅम्प) हे शुक्रवारी (दि.२२) रात्री सव्वानऊ वाजता देवळाली कँम्प भागातील भैरवनाथ मंदिरासमोरील दुकान बंद करून कारने घरी जात होते. त्यावेळी दुसर्‍या कारमधून आलेल्या संशयितांनी कुरापत काढून थेट हातात हातोडी, गावठी कट्टा घेऊन सचदेव यांच्या कारच्या काचा फोडल्या. त्यानंतर संशयितांनी कारमधील २५ हजार रुपयांची रोकड जबरीने लुटली. या घटनेत कारच्या काचा फुटल्याने सचदेव यांच्या हातास व चेहर्‍यास दुखापत झाली. याप्रकरणी सचदेव यांच्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संशयितांवर जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

कट्टा, हत्यारांचा धाक दाखवून लुटले, तिघांना मारहाण

दरोडेखोरांनी देवळाली कॅम्प व उपनगर परिसरात दहशत माजविल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अवघ्या तासाभरात हेच संशयित रात्री साडेदहा वाजता देवळाली गावातील जाधव मळा परिसरातील सुवर्ण सोयायटीत गेले. त्यांनी आदित्य किशोर आवारे व त्याचे मित्र कृष्णा साकला, संतोष पगारे व शुभम जाधव हे ऑफिसमध्ये गप्पा मारत असतानाच त्यांना नाहक शिवीगाळ करून कट्टा व हत्यारांचा धाक दाखवून आवारेच्या खिशातील पाच हजार रुपये काढून तिघांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर संशयित ऑफिसच्या काचा व सीसीटीव्ही कॅमेरे फोडून पळून गेले. याप्रकरणी उपनगर पोलिसांत जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

असे पकडले दरोडेखोर

जबरी लुटीचे दोन गुन्हे दाखल झाल्यावर दरोडेखोर शनिवारी (दि. २३) पहाटे पावणेतीन वाजता कारमधून जय भवानी रोडवरील शकुंता पेट्रोल पंपानजीकच्या मोकळ्या जागेत लपले होते. त्यावेळी उपनगर पोलीस ठाण्याचे रात्रगस्त अधिकारी सहायक निरीक्षक सुयोग वायकर, सुंदरनगर चौकी व गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करताना मैदानात पोहोचले. पोलिसांना पाहताच आठपैकी काही जण पळून गेले तर पथकाने पाठलाग करुन तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, ते दरोडेखोर असल्याचे समोर आले. शिवाय, संशयितांकडे दरोड्याच्या तयारीनिशी एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, कोयता, नायलॉन दोर, मिरची पूड असल्याचेची उघडकीस आले. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी व उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या सूचनेने सहायक निरीक्षक सुयोग वायकर व पथकाने केली.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -