नाशिक ८.५, निफाडला ७.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद

नाशिक शहर व निफाडच्या तापमानात घट झाली आहे. दिवसा उन्हाचा तडाखा आणि रात्री थंडीचा तडाखा यामुळे वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण कायम आहे. पारा अचानक घसरल्याने सर्दी खोकल्याने डोके वर काढले असून रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे.

शहर व जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून थंडीने मुक्काम ठोकला असून नाशिकमध्ये आज सर्वात नीचांकी तपमानाची नोंद झाली आहे. आज नाशिकचे तपमान ८.५ तर निफाडचे सर्वात कमी असे ७.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. थंडी वाढल्याने त्याचा परिणाम दैनंदिन जनजीवनावर झाला आहे. जिल्ह्यातही गारठा वाढला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून नाशिकबरोबरच जिल्ह्यात दिवसाही गारवा जाणवत आहे. थंडीमुळे अनेकांच्या अंगात दिवसाही स्वेटर दिसत आहे.

थंडीमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ

थंडीमुळे नाशिककर गेल्या काही दिवसांपासून रात्री दहा वाजेच्या आत घर गाठताना दिसत आहेत. त्यामुळे, रस्त्यावर रात्री दहा वाजेनंतर शहरात सामसूम दिसून येत आहे. जिल्ह्यात वाढत्या थंडीपासून द्राक्षबागांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी शेकोट्यांसारखे उपाय करू लागले आहेत. वाढलेल्या थंडीमुळे द्राक्षांचे मनी तडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांना साड्यांचे आवरण, तसेच घडांना कागदाचे आवरण घातलेले दिसून येत आहे. दिवसा उन्हाचा तडाखा आणि रात्री थंडीचा तडाखा यामुळे वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण कायम आहे. काही अंशी बारीक गार वारादेखील सुरु आहे. त्यामुळे, त्वचेचे विकार होण्याची शक्यता आहे. पारा अचानक घसरल्याने सर्दी खोकल्याने डोके वर काढले असून रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे.