तर मनसेविरोधात निवडणूक आयोगात तक्रार, नाशिक पोलिस आयुक्त ‘Action’ मोडमध्ये

Nashik CP Deepak Pandey Meets Raj Thackeray

नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज सकाळी भेट घेतली. आगामी महापालिका निवडणूकांच्या अनुषंगाने ही भेट घेतली असल्याचे कळते आहे. पण ही भेट सदिच्छा असल्याचे पांडे यांनी स्पष्ट केले आहे. मनसेने नाशिकमध्ये लावलेले होर्डिंग तसेच रास्तारोको आंदोलन या पार्श्वभूमीवर भेट घेतली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भेटी दरम्यान शहरातील होर्डिंगबाबतचीही चर्चा झाल्याचे कळते. नाशिक पोलिसांनी होर्डिंग काढण्याची कारवाई केल्यानंतरही पुन्हा शहरात होर्डिंग दिसल्याने पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. मनसे कार्यकर्त्यांच्या होर्डिंग प्रकरणात सुरूवातीला समज देऊन कारवाईचाही इशारा पोलिसांकडून आता देण्यात आला आहे. तर दीपक पांडे आणि राज ठाकरे यांच्यातील भेटीत गरज पडल्यास निवडणूक आयोगाकडेही तक्रार करणार असल्याचा पवित्रा नाशिक पोलिसांकडून घेण्यात आला आहे. (Nashik CP Deepak Pandey meets mns chief raj thackeray over illegal hoarding in nashik city by mns partyworkers)

मनसेने नाशिक शहरामध्ये होर्डिंग्ज लावली होती. पण पालिकेच्या मदतीने नाशिक पोलिसांनी ही होर्डिंग्ज काढून टाकण्यात आले होते. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पुन्हा एकदा होर्डिंग्ज दिसून आले. या होर्डिंग्जविरोधात कारवाई करताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळेच नाशिक पोलिसांनी राज ठाकरेंची भेट घेतली असल्याचे कळते. या भेटीनंतर पोलिस आयुक्तांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वकाही सुरळीत पार पडावं या मुद्द्यावर चर्चा या भेटी दरम्यान झाली. राज ठाकरे हे मोठे नेते आहेत आणि एक जवाबदार पक्षाचे नेते आहेत ते आम्हाला सहकार्य करतील अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अनधिकृत होर्डिंग संदर्भात स्थानिक नेत्यांवर कारवाई केल्याचेही त्यांनी सांगितले.

नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत ते राजकीय नेत्यांविरोधातील कारवाईच्या पवित्र्यामुळे. याआधीही अनिल परब आणि नारायण राणे यांच्याविरोधातील तक्रारींमुळे ते सातत्याने चर्चेत आहेत. त्यामध्येच आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात त्यांची चर्चा होऊ लागली आहे. शिवसेना, भाजप आणि आता मनसेच्या निमित्ताने त्यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण मनसे अध्यक्षांच्या भेटीनंतर आगामी काळात त्यांचा मनसेविरोधात काय पवित्रा राहणार हे लवकरच स्पष्ट होईल.


हेही वाचा – राज ठाकरेंचा पुणे तर अमित ठाकरेंचा नाशिक दौरा