Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र नाशिक ढोलचा डंका : 'आयटी'च्या तरुणांचे ऐटीतले ‘शिवसंस्कृती ढोलपथक’

नाशिक ढोलचा डंका : ‘आयटी’च्या तरुणांचे ऐटीतले ‘शिवसंस्कृती ढोलपथक’

Subscribe

नाशिक : गणेश विसर्जन मिरवणूक म्हटले की अनेकजण मुंबई आणि पुण्यातील मिरवणुकीतील लयबद्ध व तालबद्ध असलेल्या ढोलपथकांचे वादन पाहायचे. त्याप्रमाणे नाशिकमध्येही ढोलवादन संस्कृती रुजवण्यासाठी 7 आयटी तरुण 2011 मध्ये एकत्र आले. त्यांनी शिवसंस्कृती ढोलपथकाची स्थापना केली. तरुणांनी पुण्यातील ढोलपथकांचे सुटीच्या दिवशी जाऊन पथकप्रमुख, वादकांची संवाद साधत वादन शिकले. त्यानंतर या तरुणांनी गणेशोत्सव मिरवणुकीत वादन करत नाशिककरांची मने जिंकलीत आणि तेंव्हापासून नाशिकमधील मिरवणुकीमध्ये ढोलपथकांचे वादन सुरु झाले, अशी माहिती शिवसंस्कृती ढोलपथकाचे पथकप्रमुख अरुण मुंगसे, अभिजीत पवार, सुशांत धारणकर, स्वप्निल कासार, सचिन धारणकर, चैतन्य खैर व महेश गोसावी यांनी ‘माय महानगर’शी बोलताना दिली.

अरुण मुंगसे म्हणाले की, 2011 मध्ये आम्ही 7 मित्र एकाच ठिकाणी आयटी कंपनीत नोकरीला होतो. दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीतील वादन पाहून ढोल-ताशा वादनाची आवड निर्माण झाली. नाशिकमध्येही पुण्याप्रमाणे ढोलपथकांचे वादन झाले पाहिजे, यावर 7 मित्रांचे एकमत झाले. सात जणांचे विचार जुळत गेले. नोकरी संभाळून 7 जण पुण्यातील ढोपपथकांच्या प्रमुख व वादकांची भेट घेऊ लागले. दर शनिवार व रविवारी सात जण पुण्याला जायचो. पुण्यातील पथकांकडून ढोल, ताशा, ताल, पान, दोरी, पिंप आदी शास्त्रोक्त माहिती करून घेतली. प्रसंगी वादनाचे व्हिडीओसुद्धा रेकॉर्ड केले. ते पाहून नाशिकमध्ये वादन करण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

2011 मध्ये शिवसंस्कृती ढोलपथक सुरु केले. त्यावेळी अवघ्या दोन महिला व सुमारे 50 पुरुष होते. आता पथकामध्ये 50 महिला व 80 पुरुष आहेत. यामध्ये चिमुकल्यांपासून वयोवृद्धांचासुद्धा सहभाग आहे. तीन महिन्यांपासून वादनाचा सराव वडनेर गेट परिसरात केला जात आहे. महिलांना ढोलवादन करता येईल का, काही त्रास होतो का, असे अनेक प्रश्न काही महिला विचारू लागल्या असता पथकप्रमुखांनी वादन करण्यास सांगितले. त्यावेळी महिलांनी वादनाचा सराव केला आणि त्यांच्या शंका दूर झाल्या. त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण झाला. तेंव्हापासून दरवर्षी महिलांची संख्याही वात आहे.

तंत्रज्ञानाच्या युगात नागरिक सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. अनेकांचा दैनंदिन जीवनातील आनंद हरपला आहे. मात्र, ढोलवादनामुळे अनेकांना मित्रपरिवार मिळाला असून, त्यांच्यामध्ये आनंद निर्माण झाला आहे. ढोलवादन करणार्‍यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास निर्माण झाला असून, सर्वजण तणावमुक्त राहत आहेत. अनेक महिला आता सलग आठ तास ढोलवादन करत आहेत. वादनातून मिळणार्‍या मानधानातून जागा भाडे, साहित्य देखभाल व दुरुस्तीचा खर्च केला जात आहे. दरवर्षी नवीन ताल बसवला जातो. यंदाही गणेशभक्तांसाठी नवीन ताल बसविली आहे. यंदा गणेशभक्तांना शिवसंस्कृती ढोलपथकाचे वादन मानाचा पाचवा गणपती असलेल्या मंडळ, पेठ रोडच्या श्रीमान सत्यवादी मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत पाहता येईल.

बालपणापासून वादनाची आवड आहे. नाशिकमध्ये 2011 मध्ये पहिलेच ढोलपथक सुरु होत असून, त्यात वादन करणार असल्याचे आई-वडिलांना सांगितले. त्यावेळी कुटुंबियांनी प्रतिसाद दिली. नाशिकमध्ये पारंपारिक ढोलसंस्कृती रुजल्याचा मनस्वी आनंद आहे. : स्वप्निल कासार, पथकप्रमुख, शिवसंस्कृती

अशी आहेत ढोलपथकाची वैशिष्ठ्ये

  • शिवसंस्कृती ढोलपथकांमध्ये मर्दानी खेळ असून, यामध्ये वेगवेगळे कलाकार आहेत.
  • पथकाचा पांढरा कुर्ता, सलवार, फेटा असा पोशाख असून, प्रत्येकाच्या फेटाच्या वेगवेगळा रंग आहे.
  • दरवर्षी तिथीप्रमाणे शिवजयंतीच्या दिवशी सीबीएस परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ढोलवादन केले जाते.
  • पथकामार्फत गोदावरी नदी संवर्धनासाठी प्रबोधन केले जात आहे.
  • पथकामार्फत निर्माल्य विसर्जन जनजागृती केली जात आहे.
  • पथकामार्फत आधाराश्रमातील अनाथांना गरजेनुसार कपडे व इतर साहित्य दिले जाते.
  • पथकामध्ये जपानचे चार नागरिक वादनासाठी सहभागी झाले होते.
  • पथकामार्फत कोरोनाकाळात रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

ढोलवादनाची बालपणापासून इच्छा होती. सुरुवातीला मित्रांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत ढोलवादन शिकले. गणेश विसर्जन मिरवणुकीतील वादन पाहून मित्रांनी कौतुक केले. : सुशांत धारणकर, पथकप्रमुख, शिवसंस्कृती

नाशिककरांचे प्रबोधन

- Advertisement -

नाशिकमध्ये 2011 मध्ये ढोलपथकांचे वादन हे सर्व नाशिककरांसाठी नवीन होते. पारंपारिक ढोलपथकांबद्दल नागरिकांमध्ये प्रबोधन केले. तरुणांना ढोलपथकाची माहिती होण्यासाठी केटीएचएम व बीवायके महाविद्यालयाबाहेर बॅनर लावले होते. त्यास यश आले. तरुणाईसह सुशिक्षित नागरिक व महिला उत्स्फूर्तपणे ढोलवादनासाठी पुढे आल्या. २०११ मध्ये नाशिकमधील गणेश विसर्जन मिरवणुकीत पहिले ढोलवादन केले. त्यावेळी गणेशभक्तांसह उपस्थित नागरिकांनी वादन पाहण्यासाठी गर्दी केली. वादन पाहून सर्वांनी कौतुक केले. तेंव्हापासून शिवसंस्कृती ढोलपथकाचा प्रवास सुरु असून, दरवर्षी वादकांची संख्या वाढत आहे. वादकांमध्ये अनेक डॉक्टर, इंजिनीअर, व्यायसायिक आहेत, असे पथकप्रमुख अभिजीत पवार यांनी सांगितले.

2011 च्या आधी नाशिकमध्ये एकही ढोलपथक नव्हते. नाशिकमध्ये ढोलपथक असले पाहिजे, यासाठी पुढाकार घेतला. नोकरी संभाळून ढोलवादन शिकण्याचे ठरविले. त्यासाठी सात मित्र पुण्याला नाशिकरोड रेल्वे स्टेशनहून भुसावळ ते पुणे रेल्वेने जायचो. तेथून पथक सराव करत असलेल्या सिंहगड रोडवरील म्हात्रे पूल परिसरापर्यंत चालत जायचो. वादनामुळे कधीही थकवा व तणाव आला नाही. उलट आनंद मिळत गेला. : अरुण मुंगसे, पथकप्रमुख, शिवसंस्कृती

नाशिकमध्ये ढोलवादन पाहिल्याने वृद्धाने दिले बक्षीस

नाशिक शहरामध्ये ढोलपथकाचे वादन 2011 पूर्वी झाले नव्हते. अनेक नाशिककर ढोलवादन पाहण्यासाठी पुणे किंवा मुंबईला जायचे. नाशिकमध्ये 2011 मध्ये चांदीचा गणपती मंदिरासमोर ढोलवादन केले जात होते. त्यावेळी मायको कंपनीचे निवृत्त कर्मचारी गणेशोत्सवानिमित्त खरेदीसाठी आले होते पण ते वादन पाहून आनंदीत झाले. त्यांनी कुटुंबियांशी मोबाईलव्दारे संपर्क साधत त्यांना ढोलवादन पाहण्यास बोलविले. शिवाय, नाशिकमध्ये ढोलवादनास सुरुवात केल्याने शिवसंस्कृती ढोलपथकास 500 रुपये बक्षीस दिले. वयोवृद्धांनी केलेल्या कौतुकाने वादकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. शिवाय, सात मित्रांना नाशिकमध्ये ढोलसंस्कृती रुजत असल्याने आनंद झाला होता.

- Advertisment -