नाशिक : देशात अपघातांच्या संख्येत महाराष्ट्र टॉप ५ मध्ये आहे तर नाशिक जिल्हा राज्यात सर्वाधिक अपघातप्रवण जिल्हा म्हणून क्रमांक एकवर असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. यंदा जानेवारी ते जुलै या सात महिन्यात 914 अपघात झाले असून 578 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 441 जण जखमी झाले आहेत. यात महत्वाची बाब म्हणजे अतिवेग नाशिककरांच्या जीवावर बेतत असल्याचे महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
नाशिकसह जिल्ह्यात दररोज अपघाताच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून यात दुचाकी अपघाताचे प्रमाण अधिक आहे. रोजच अपघात होत असून याला ओव्हरस्पिडिंग कारणीभूत असल्याचे पोलिसांच्या सर्वेक्षणांवरून समोर आले आहे. यानुसार दिवसेंदिवस अपघाती मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान महामार्ग पोलिसांनी याबाबत राज्यात होणार्या अपघातांची आकडेवारी जाहीर केली असता 2021 या वर्षांत महाराष्ट्र अपघाताच्या संख्येत सहाव्या क्रमांकावर असून तब्बल 29 हजार 477 अपघात झाले आहेत. 13 हजार 528 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2022 मध्ये 33 हजार 383 अपघात झाले असून यात 15 हजार 224 मृत्यू झाले आहेत. तर राज्यात नाशिकचा नंबर पहिल्या क्रमांकावर असून यंदा जानेवारी ते जुलै या सात महिन्यात 914 अपघात असून 578 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 441 जण जखमी झाल्याचे समोर आले आहे.
अशी आहे आकडेवारी
नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत सर्वाधिक अपघात असून 2021 मध्ये 1429 अपघातात 862 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2022 मध्ये 1462 अपघात 912 मृत्यू झाले आहेत. तर यंदा जानेवारीपासून ते जुलै पर्यंत 914 अपघात झाले असून 578 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी फक्त नाशिक ग्रामीण भागातली असून नाशिक शहर पोलीस हद्दीतील आकडेवारी देखील चिंताजनक आहे. नाशिक शहरात 2021 मध्ये 470 अपघातात 185 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2022 मध्ये 479 अपघात 207 मृत्यू झाले आहेत. तर यंदा जानेवारीपासून ते जुलै पर्यंत 288 अपघात झाले असून 122 जणांचा मृत्यू झाला आहे. ओव्हरस्पिडिंगमुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
मध्यरात्री सर्वाधिक अपघात
दरम्यान अपघातांवर योग्य उपाययोजना करून रस्ते अपघात आणि मृत्यूची संख्या कमी करण्याच्या प्रयत्नात, महामार्ग पोलिसांनी सर्व अपघातांचे विश्लेषण केले आहे. यानुसार असे आढळून आले की सर्वाधिक अपघात मध्यरात्रीच्या दरम्यान झाले आहेत, संध्याकाळी 4 ते 8 ही रस्त्यांवरील वाहतुकीची सर्वाधिक वेळ असते आणि रस्त्यावर जास्त वाहने असतात, तर वास्तविक रॅश ड्रायव्हिंग रात्री 8 नंतर सुरू होते. रात्री 8 नंतर, रस्त्यावर वाहनांची संख्या कमी होते, यामुळे अनेकजण ओव्हरस्पीडच्या नादात जीव गमावून बसतात. यामुळे रात्रीच्या वेळी अपघातांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.