घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक महापालिकेचे ‘तारे जमींपर’; स्वच्छतेत अवघा एक स्टार

नाशिक महापालिकेचे ‘तारे जमींपर’; स्वच्छतेत अवघा एक स्टार

Subscribe

केंद्राकडून देशभरातील स्वच्छ शहरांचे रेटींग जाहीर

’स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’चे ब्रीद मिरवणार्‍या आणि स्वच्छता सर्वेक्षणात देशभरातील पहिल्या दहा शहरांमध्ये समावेशाचे स्वप्न बघणार्‍या महापालिका प्रशासनाला केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या सर्वेक्षणाने जोरदार धक्का दिला आहे. देशभरातील स्वच्छ आणि कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटींगची घोषणा करण्यात आली असून नाशिकला अवघा एक स्टार मिळाला आहे. महाराष्ट्रातील नवी मुंबईने देशभरातील पाच फाईव्ह स्टार रेटींग शहरामध्ये स्थान पटकावले आहे. तर धुळे, जळगाव या शहरांना देखील थ्री स्टारचा दर्जा मिळाला आहे.

केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंग पूर यांनी मंगळवारी(दि.१९) दिल्लीत पत्रकार परिषद घेत देशातील स्वच्छता व कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटींगची घोषणा केली. केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. यंदा या अभियानाचे पाचवे वर्षे आहे. या अभियानांतर्गत दरवर्षी जानेवारीत स्वच्छ शहर स्पर्धा आयोजित केली जाते. राज्यभरात मिशन मोड पद्धतीने अभियान सुरू करण्यात आले. या अभियानांतर्गत सर्व शहरे हागणदारीमुक्त करणे आणि घनकचरा व्यवस्थापनांतर्गत स्वच्छ करणे अशा दोन बाबींचा समावेश आहे. या अभियानाचा भाग म्हणून शासनाच्या वतीने कचरामुक्त शहरांना तारांकित मानांकन(स्टार रेटिंग) जाहीर केले जाते. यासाठी सुरूवातीला शासनाने निर्धारित केलेल्या निकषांच्या आधारे स्वत:चे थ्री स्टार रेटींग केले होते. त्यानंतर डिसेंबर २०१९मध्ये केंद्रीय निरीक्षक पथक नाशकात आले होते. या पथकांमार्फत शहरातील घनकचरा व्यवस्थापनासह दैनंदिन स्वच्छता, कचरामुक्ती अभियान, सिंगल प्लास्टिक वापरावरील बंदी, नालेसफाई, आदी निकषांच्या आधारे तपासणी करण्यात आली. गतवर्षी महापालिकेला थ्री स्टार रेटिंग प्राप्त झाले होते. यंदा फाइव्ह स्टार रेटिंग मिळविण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू होते. परंतू महापालिकेच्या आणि नाशिककरांच्या स्वप्नांना सुरूंग लागला आहे. केंद्रीय मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या निकालात नाशिकला अवघा एक स्टार मिळाला आहे. देशातील ५ शहरांना फाईव्ह स्टार, ६५ शहरांना थ्री स्टार तर ७० शहरांना १ स्टार रेटींग देण्यात आले आहे.

- Advertisement -

राज्यात नवी मुंबई नंबर वन

फाईव्ह स्टार शहरांच्या यादीत राज्यातील एकमेव नवी मुंबईचा समावेश होवू शकला आहे. याशिवाय छत्तीसगढ राज्यातील अंबिकापूर, गुजरात राज्यातील राजकोट, कर्नाटक राज्यातील मैसूर, मध्यप्रदेशातील इंदूर या शहरांना फाईव्ह स्टार रेटींग प्राप्त झाले आहे.

थ्री स्टारवाले ही शहरे

नाशिकच्या जवळ असलेल्या धुळे, जळगाव या शहरांना थ्री स्टार दर्जा मिळाला आहे. याशिवाय ठाणे, भिवंडी, अंबरनाथ, मीरा भाईंदर, शिर्डी, रत्नागिरी, पाचगणी,वेंगुर्ला आणि जेजुरी या शहरांना देखील थ्री स्टार देण्यात आले आहेत.

- Advertisement -

या शहरांना महाराष्ट्रात अवघा एक स्टार

नाशिक, शिरपूर-वर्वडे, मुरबाड, वसई-विरार, जव्हार, रावेर, फुलंब्री, खोपोली, कल्याण-डोंबिवली, पनवेल, कुलगाव, बदलापूर, महाड, पेन, वाडुज, उरण इस्लामपूर, खानापूर, शहादा, वरणगाव, जामनेर, मलकापूर, अकोला, पैठण, भगूर, वैजापूर, अहमदनगर, संगमनगर, गेवराई, कुरूंदवड, दौंड, बारशी, मंगलवेढे, अंजनगाव सुरजी, शैलू, राजुरा, बल्लारपुर, नागभीड, खापा, महाधुला, रामटेक, शंदूरजणघाट.

 

नाशिक महापालिकेचे ‘तारे जमींपर’; स्वच्छतेत अवघा एक स्टार
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -