नाशिकचे सेना खासदार हेमंत गोडसे यांचेही भाजपाशी जुळवून घेण्यासाठी उद्धव ठाकरेंना साकड

नाशिक : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आमदारांनी  बंडखोरी करत शिवसेनेला  धक्का दिल्यानंतर शिवसेनेचे अनेक खासदारही बंडाचा झेंडा हाती घेण्याच्या विचारात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे  यांनी मातोश्रीवर काल झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना स्वीकारण्याच्या मागणीसह केंद्र आणि राज्य सरकार एकत्र असेल तर विकास कामांना गती मिळेल. त्यामुळे नैसर्गिक युती करावी अशी मागणी केली आहे. आदिवासी महिला देशाची राष्ट्रपती होत आहे त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यावा, असे मत बैठकीला उपस्थित बऱ्याचशा खासदारांनी व्यक्त केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले.

गोडसेंनी काय भावना व्यक्त केली 

 मी नाशिकचा खासदार म्हणून ८ वर्षे काम करत आहे. कुठलेही काम करायचे ठरले तर राज्य आणि केंद्र हे संयुक्तपणे करत असते. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील युती ही नैसर्गिक युती आहे. नाशिक लोकसभेचा विचार केला तर या मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी नाशिक शहरातील तीन आमदार हे भाजपाचे आहे. तर ग्रामीण भागातील तीन आमदार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत. ते शिवसेनेविरोधात लढून निवडून आलेले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी कायम ठेवली तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते अडचणीचं ठरेल. शिवसेनेचा उमेदवार काय करेल, हा प्रश्न उपस्थित होईल

एकनाथ शिंदेसोबत जुळवून घ्या

 २५ वर्षांच्या शिवसेना-भाजप युतीचा आणि अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारचा अनुभव वेगळा आहे. २५ वर्ष नैसर्गिक युती होती मात्र अडीच वर्षात अनेक प्रकल्प रखडले. तसेच भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास अनेक विकासकामे मार्गी लागतील तर एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घेऊन त्यांना सन्मानाने पक्षात परत घ्यावे अशी मागणीही पक्षप्रमखांकडे केल्याचे गोडसे यांनी सांगितले.