घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदिवाळीनंतरच मिळणार महापालिका कर्मचार्‍यांना पदोन्नती

दिवाळीनंतरच मिळणार महापालिका कर्मचार्‍यांना पदोन्नती

Subscribe

आयुक्त कैलास जाधव यांची स्पष्टोक्ती; ऐन सणासदीत कर्मचारी वर्गाचा हिरमोड

महापालिका कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीची फाईल अंतिम स्वाक्षरीसाठी आयुक्त कैलास जाधव यांच्या टेबलावर असली तरी आयुक्तांना कार्यबाहुल्यामुळे या फाईलचा अभ्यास करण्यास वेळ नाही. परिणामी यंदाच्या दिवाळीतही कर्मचार्‍यांना पदोन्नतीचे गिफ्ट मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. दिवाळीनंतर प्राधान्यक्रमाने पदोन्नतीची फाईल मंजूर केली जाईल असे आयुक्त कैलास जाधव यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना स्पष्ट केले.
गेल्या ५ जानेवारीपासून पदोन्नतीसाठी प्रशासनाने विभाग निहाय बैठका सुरु केल्या होत्या. महापालिकेत ४ हजार ७१२ अधिकारी व कर्मचारीच कार्यरत आहेत. आकृतिबंधानुसार ७०८२ पदे मंजूर आहेत. यातील ३६८ पदे खुले आहेत. सुमारे २ हजार ३७० पदे रिक्त आहेत. प्रशासनाच्या नियोजनानुसार पहिल्या टप्प्यात ३५० रिक्त पदांवर पदोन्नतीची संधी देण्यात येणार आहे. प्रारंभीच्या काळात २०२०च्या वर्षअखेरपर्यंत पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगण्यात आले. हा मुहूर्त टळल्यावर स्थायी समितीच्या बैठकीत यावर जोरदार चर्चा झाली. या वेळी सभापती गणेश गिते यांनी १० फेब्रुवारीपर्यंत पदोन्नतीसाठी अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर १५ फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण होईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. प्रत्यक्षात कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीसंदर्भात छाननी प्रक्रिया बराच काळ सुरु होती. यात कास्ट व्हेरिफिकेशन, शैक्षणिक पात्रतेविषयीच्या कागदपत्रांची पूर्तता या बाबींचा समावेश होता. त्यानंतर पदोन्नतीचा अहवाल आयुक्त कैलास जाधव यांच्यासमोर सादर करण्याची वेळ आली तेव्हा शासनाचा नवीन आदेश प्रशासनास प्राप्त झाला. त्यामुळे छाननी प्रक्रियेत अधिकचे कर्मचारी समाविष्ठ होऊन पदोन्नतीची प्रक्रिया लांबणीवर पडली. या आदेशानुसार महापालिकेत खुल्या गटातीलच नव्हे तर राखीव गटातही पदोन्नती देण्यात येणार आहे. परंतु या आदेशानंतरही पदोन्नतीला मूहुर्त सापडलेला नाही. या संदर्भात आता उपायुक्त मनोज घोडे पाटील बोलायला तयार नाहीत. आयुक्तांच्या टेबलवर अतिम मंजुरीसाठी फाईल गेली असून तिच्यावर स्वाक्षरी झाल्यास पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे. परंतु कोरोनानंतर आयुक्तांचे प्रशासकीय कामे वाढली आहेत. त्यातच त्यांच्या बदलीचीही चर्चा सुरु असल्याने सध्या ते नाजूक विषयांना हात घालणे टाळत असल्याचे समजते. यासंदर्भात ‘आपलं महानगर’ने आयुक्तांशी चर्चा केली असता कार्यबाहुल्यामुळे मला या फाईलचा अभ्यास करण्यास वेळ उपलब्ध झाला नाही. परंतु दिवाळीनंतर हा विषय प्राधान्यक्रमाने मार्गी लावतो, असे त्यांनी सांगितले.

पदोन्नतीच्या प्रतीक्षेत काही निवृत्त झाले तर काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर-

महापालिकेच्या कर्मचार्‍यांना अनेक वर्षांपासून पदोन्नती मिळालेली नाही. काही कर्मचारी तर महापालिकेत ज्या पदावर रुजू झालेत, त्याच पदावर आहेत. पदोन्नती तालिकेत अशा अनेक कर्मचार्‍यांना संधी मिळणार आहे. परंतु प्रशासकीय दिरंगाईमुळे पदोन्नतीची फळे पात्रता असतानाही कर्मचार्‍यांना चाखायला मिळत नाही. गंभीर बाब म्हणजे, या कालापव्यायामुळे अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. काही कर्मचारी आगामी काळात सेवा निवृत्त होणार आहेत. अशा कर्मचार्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान पदोन्नती न झाल्याने होत आहे.

दिवाळीनंतरच मिळणार महापालिका कर्मचार्‍यांना पदोन्नती
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -