कालिदास कलामंदिराच्या भाडेतत्वात ५० टक्क्यांनी कपात

कोरोनाकाळात वर्षभरासाठी कपात; स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी बैठकीत जाहीर केला निर्णय

कोरोनामुळे नाट्यक्षेत्राला मोठाच आर्थिक फटका बसला असताना त्यातच महाकवी कालिदास कलामंदिराचे भाडे देखील अव्वाच्या सव्वा असल्याने नाशिकमध्ये नाटकांचे प्रयोगच बंद झाले आहे. या प्रश्नी नाट्यकर्मींनी सातत्याने ओरड केल्याने स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी वर्षभरासाठी ५० टक्के भाडेकपात करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या शुक्रवारी (दि. ११) झालेल्या बैठकीत घेतला. यामुळे नाट्यचळवळीला पुन्हा चालना मिळेल असे बोलले जात आहे.
लालालॉकडाऊनच्या काळात सहा महिने राज्यातील सर्वच नाट्यगृह बंद होते. त्यानंतर गेल्या महिन्यात नाट्यगृह खुली करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली. महापालिका प्रशासनानेही शहरातील अद्यावत असलेले महाकवी कालिदास कलामंदिराची या काळात डागडुजी करुन तसेच सॅनिटायझरची फवारणी करुन सुसज्ज केले. लॉकडाऊन पूर्णत: हटत नाही तोपर्यंत केवळ ५० टक्के प्रेक्षकांनाच नाट्यगृहात परवानगी देण्यात आली. असे असले तरी कालिदास कलामंदिराचे भाडे अव्वाच्या सव्वा असल्याने नाट्यप्रयोग करणार्‍या संस्थांनी नाशिककडे पाठ फिरवली. त्यामुळे नाट्यप्रेमींना नाट्यप्रयोगापासून मुकावे लागले. कोरोनाच्या प्रभाव काळात नाट्यगृह २५ ते ५० भाडेतत्वावर उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी नाट्यकर्मींकडून करण्यात आली. त्यानुसार स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र हा प्रस्ताव मर्यादीत कालावधीसाठीच मंजूर करावा अशी मागणी माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी केली. त्यानुसार एका वर्षाच्या कालावधीसाठी महाकवी कालिदास कलामंदिराच्या भाड्यात ५० टक्के कपात करण्यात येत असल्याचे सभापती गिते यांनी जाहिर केले.