घरताज्या घडामोडीनाशिक पोलिसांची राणेंना नोटीस, २ सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश

नाशिक पोलिसांची राणेंना नोटीस, २ सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश

Subscribe

नाशिक पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील एफआयआरच्या अनुषंगाने एक नोटीस पाठवली आहे. तसेच नारायण राणे यांना येत्या २ सप्टेंबरला नाशिकच्या पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे. नाशिकच्या सायबर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार राणेंना येत्या दिवसांमध्ये हजेरी लावावी लागणार आहे. नाशिकच्या शिवसेनेच्या महानगर प्रमुख पदावर असणाऱ्या सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणे यांच्याविरोधात नाशिकच्या सायबर पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमुळेच नारायण राणे यांना येत्या २ सप्टेंबरला नाशिक पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. अन्यथा नारायण राणेंच्या अडचणीत आणखी भर पडू शकते.

- Advertisement -

बडगुजर यांच्या तक्रारीनुसार नारायण राणे यांनी महाडच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांविरोधात बदनामीकारक, द्वेषभाव निर्माण करणारी विधाने करून समाजात शत्रुत्वाची भावना निर्माण होईल असे वक्तव्य केले. तसेच त्या पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्र राज्यातील तसेच नाशिक शहरातील व जिल्ह्यातील विविध गटातील सदस्य व व्यक्तींमध्ये तेढ निर्माण होईल. शत्रुत्व आणि दुष्टपणाची भावना निर्माण होईल अशा प्रकारे सोशल मिडियाच्या माध्यमातून विधाने ही जाणीपूर्वक प्रसारीत केली. ही वक्तव्ये सोशल मिडियावर एकल्याचे आणि पाहिल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. राणेंच्या अशा वक्तव्याने मुख्यमंत्री या घटनात्मक पदांच्या व प्रतिषठित राजकीय व्यक्तीमत्वाच्या लौकीकास बाधा आणली जात आहे. तसेच यातून शिवसेनेचीही बदनामी केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

नारायण राणे यांनी जाणीवपूर्वक पद्धतीने पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून काही शब्द उच्चारल्याने मुख्यमंत्री पदाची गरीमा व प्रतिमा मलिन करून शिवसेना पक्षाची बदनामी केली. याबाबतची एक व्हिडिओ क्लिपही त्यांनी पेनड्राईव्हमध्ये सोबत पोलिसांना दिली आहे.

- Advertisement -

काय होते नारायण राणेंचे विधान ?

देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली हे बाजुला विचारावे लागते, हिरक महोत्सव आहे हे पण माहिती नाही मुख्यमंत्री यांना, कळत नसेल तर एखादा सेक्रेटरी बाजुला ठेवून बोलत जा. मी असतो तर कानाखाली चढवली असती, असे वक्तव्य नारायण राणेंनी केले. अशा वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील तसेच नाशिक शहरातील, जिल्ह्यातील विविध गटातील व्यक्तींमध्ये तेढ निर्माण होईल, शत्रुत्व व दुष्टपणाची भावना निर्माण होईल म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक हे विधान प्रसारीत केले. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या घटनात्मक पदाला आणि प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीमत्वाच्या लोकीकास बाधा आणली, पक्षाची बदनामी केली अशी तक्रार नारायण राणे यांच्या विरोधात बडगुजर यांनी केली आहे.


हे ही वाचा – जामीन मिळताच नारायण राणे यांच पहिले ट्वीट, ‘सत्यमेव जयते’


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -