घरताज्या घडामोडीशिवसेनेच्या नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनाने निधन

शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनाने निधन

Subscribe

शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे शनिवारी मध्यरात्रीनंतर निधन झाले. माजी महापौर विनायक पांडे यांच्या त्या वहिनी होत.
कल्पना पांडे या प्रभाग क्रमांक २४ चे प्रतिनिधीत्व करत होत्या. त्या नाशिक महापालिका निवडणुकीत चार वेळा निवडणून आल्या होत्या. त्यांचे पती चंद्रकांत पांडे यांनी एकदा या प्रभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. कल्पना पांडे यांनी सिडको प्रभाग सभापती म्हणून दोन वेळा काम केले. पालिकेतील काही समित्यांवर त्यांनी काम केले. महापालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव असलेल्या पांडे यांची प्रभागातील विकास कामे आणि मतदारांशी राखलेला जनसंपर्क यावर भिस्त होती. अतिशय मनमिळावू स्वभावाच्या असलेल्या कल्पना पांडे यांचे महापालिकेतील काम अतिशय आक्रमक होते. शिवसेनेला शोभेशी अशी कामाची आक्रमक शैली असल्याने महापालिकेत त्या नेहमीच चर्चेत असत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी नंदिनी (नासर्डी) नदीतील अतिक्रमणाचा मुद्यावर आवाज उठवला होता. त्यासाठी त्यांनी स्थायी समितीच्या सभागृहात, तसेच शहर अभियंत्यांच्या कार्यालयात वारंवार आंदोलनेही केली होती.

- Advertisement -

स्थायी समितीचे सदस्य म्हणून काम करताना त्या नेहमीच विविध मुद्यांवर स्पष्ट भूमिका मांडत. महापालिकेच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग मिळावा, तसेच त्यांना पदोन्नती देण्यात यावी यासाठी त्यांनी स्थायी समितीसह महासभेत नेहमीच भूमिका मांडली होती. प्रभाग समितीच्या सभेतही त्या नेहमीच प्रभागातील मुद्यांवर आक्रमक भूमिका मांडत. गेल्या काही दिवसांपासून त्या कोरोना आजाराशी लढा देत होत्या. एका खासगी रुग्णालयावर त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शिवसेनेसह महापालिकेला मोठा धक्का बसला आहे. लोकांशी समरस होऊन काम करणारी शिवसेनेची रणरागिनी कोरोनामुळे अशी अचानक जाते, ही बाब अनेक जुन्या-जाणत्या शिवसैनिकांना चटका लावून गेली. त्यांच्यावर अमरधाम येथे रविवारी (दि. ११) सकाळी १० वाजता शासकीय नियम पाळून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

कोरोनाकाळातील कामही राहील सदैव स्मरणात-
नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनाकाळातील कामही लक्षवेधी ठरले होते. पहिल्या लाटेपासून आतापर्यंत त्यांनी सातत्याने कोरोना रुग्णांसाठी सेवा दिली. रुग्णांना हॉस्पिटल मिळवून देणे, औषधे मिळवून देणे, कोरोना विषयीची जनजागृती करणे यात त्या अग्रेसर होत्या. महापालिकेच्या वतीने कोरोनाकाळात वाटण्यात येणार्‍या औषधांवर त्यांनी आक्षेप घेतला होता. सर्दी, खोकल्याची औषधे दिल्याने रुग्णांची प्रकृती अधिक खालावत असल्याचा दावा करीत त्यांनी प्रशासनाचे डोळे उघडले होते.

- Advertisement -

 

शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनाने निधन
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -