शेतकर्‍यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कृषी संजीवनी सप्ताहास प्रारंभ

तालुक्यात आजपर्यंत 120 मिलिमीटर पाऊस

नांदगाव : शेतकर्‍यांच्या बांधावर तंत्रज्ञान पोचविणे व उत्पादनात वाढ करणे या उद्देशाने नांदगाव तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहास सोमवार (दि. २७) पासून प्रारंभ झाला आहे. नांदगाव तालुक्यात दहा ते बारा जून दरम्यान पाऊस झाला आणि त्यानंतर एक पंधरवड्याचा खंड पडला. चिंतेत पडलेल्या शेतकर्‍याला दि. 23 व दि. 24 रोजी पडलेल्या पावसाने चांगलाच दिलासा दिला. तालुक्यात आजपर्यंत 120 मिलिमीटर पाऊस पडला असून तालुक्यातील पाचही महसूल मंडळांमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे.

या पावसामुळे सात ते आठ इंचापर्यंत ओल पोहोचली असून पेरणी करण्यास समाधानकारक स्थिती आहे. शेतकर्‍यांनी अ‍ॅझोटोबॅक्टर बायोला या जैविक खतांची बीजप्रक्रिया करून पेरणी यंत्राच्या साह्याने पेरणी करावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत वन परिक्षेत्र अधिकारी चंद्रकांत कासार, शेतकरी सल्ला समितीचे सदस्य विनायक बोरसे, बाळासाहेब कवडे, आत्मा पुरस्कार विजेते आदर्श शेतकरी आणि नांदगाव तालुक्याचे रिसोर्स पर्सन जयंत जुन्नरे यांचे उपस्थितीत कृषी संजीवनी मोहिमेचे उद्घाटन गंगाधरी तालुका नांदगाव येथे करण्यात आले. याप्रसंगी जोडओळ पद्धतीने व ठिबक सिंचनाच्या साहाय्याने लागवड केलेल्या मका पिकाचे शेतात शेतकर्‍यांच्या उपस्थितीत संतुलित रासायनिक खताचा वापर आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शेतकरी सल्ला समितीचे सदस्य बाळासाहेब कवडे यांनी शेतकरी वापरत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल शेतकर्‍यांचे कौतुक केले आणि अशाच प्रयत्नाने उत्पादनात वाढ करावी असे आवाहन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नांदगाव तालुक्याचे वन परिक्षेत्र अधिकारी चंद्रकांत कासार यांनी देखील वृक्ष लागवडीबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. इफको कंपनीचा नॅनो युरिया बाजारात असून 500 मिलीच्या बाटली 240 रुपये दर त्याचा वापर शेतकर्‍यांनी फवारणीद्वारे करावा असे आवाहन इफको कंपनीचे प्रतिनिधी नितीन उमराणी यांनी केले.

कृषी संजीवनी चित्र रथास मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रासायनिक खतांचा संतुलित वापर, रासायनिक खतांमध्ये दहा टक्के बचत या धोरणानुसार जैविक खते हिरवळीचे खतांचा वापर युरिया ऐवजी नॅनो युरियाचा वापर यासाठी कृषी विभागामार्फत प्रचार करण्यात येत आहे. मका बियाण्यास जैविक खतांची बीजप्रक्रिया शालिग्राम यांनी प्रात्यक्षिकासह करून दाखविली. याप्रसंगी गंगाधरीचे सरपंच सचिन जेजुरकर, कृषी सहाय्यक सचिन मोरे, समाधान जाधव, आव्हाड, धायगुडे, अडवांटा कंपनीचे भरत ईघे, आशिष भागवत, सुनील खैरनार, जुन्नरे कुटुंबातील शेतकरी उपस्थित होते.