घरताज्या घडामोडीसंभाजीनगर न म्हणण्याची मला पक्षाकडून सूट

संभाजीनगर न म्हणण्याची मला पक्षाकडून सूट

Subscribe

नाशिक : औरंगाबाद की संभाजीनगर यावरुन अनेक दिवसांपासून वाद सुरु असताना शिवसेनेचे आमदार तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या संभाषणात औरंगाबाद असाच उल्लेख करत सेनेच्या भूमिकेला तडा दिला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे संभाजीनगर म्हणत असले तरी शासकीय नोंद असल्याप्रमाणे मी औरंगाबादच म्हणेण, असे म्हणत त्यांनी पक्षाकडून मला सूट मिळाल्याचे सांगत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे आढावा बैठकीनिमित्त गुरुवारी (दि.30) नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टिका करत त्यांनी भाजपवर तोंडसूख घेतले. गेल्या पाच वर्षांच्या काळात भाजपने काय केले? याचा विचार फडणवीस व पंकजा मुंडे यांनी एकमेकांना विचारले असते तर उपोषणाची वेळ आली नसती. दहा वर्ष केंद्रात आणि पाच वर्ष राज्यात सत्ता असताना मराठवाड्याचा विकास का झाला नाही? आता एक महिन्यात मराठवाडा भकास कसा झाला, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पंकजा मुंडे यांचे लाक्षणिक उपोषण म्हणजे राजकीय स्टंट असल्याचे म्हटले.

मराठवाड्यातील प्रत्येक आमदार किंवा मंत्र्यांनी औरंगाबाद विभागाकडे लक्ष दिले पाहिजे. त्यादृष्टीने आम्ही देखील प्रयत्नशील राहू. परंतु, मंत्रीपद जाताच दुसर्‍या पक्षाच्या मंत्र्यांवर अशा पध्दतीने टीका करणे मुंडे यांना शोभत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. मराठवाड्याचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची पहिली बैठक औरंगाबादमध्ये घेतली. मुख्यमंत्री ठाकरे हे संभाजीनगर म्हणत असले तरी, मी शासकीय नोंद असल्याप्रमाणे औरंगाबादच म्हणेल. संभाजी राजे हे तत्कालिन मोठे योध्दे होतेच. परंतु, शासकीय नोंदीप्रमाणे मी औरंबादच म्हणेल, असे सांगत त्यांनी सेनेच्या भूमिकेला उघडपणे विरोध केला आहे.

- Advertisement -

आव्हाड यांनी साईबाबांचे दर्शन घ्यावे!

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्व.इंदिरा गांधी यांच्याविषयी व्यक्त केलेले विचार अत्यंत चुकिचे आहेत. राज्याचे मंत्री म्हणून बोलताना त्यांनी काळजी घेतली पाहिजे. आपल्या बोलण्याचे काय परिणाम होतील, याची खबरदारी घेतली तर बरे होईल. त्यामुळे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतील. तथापि, त्यांनी शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेवून श्रध्दा व सबुरी राखरी पाहिजे, असा सल्लाही अब्दुल सत्तार यांनी दिला.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -