५ कोटींचे कर्ज काढून देतो असे सांगत १० लाखांचा गंडा; पुण्यातही अनेकांना कोट्यवधीच्या टोप्या

नाशिक : बँकेच्या नावे डीडी (डीमांड ड्राफ) काढून लाखोंची फसवणूक करणार्‍या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नाशिकमध्ये एका युवका ला दहा लाखांना गंडा घालणार्‍या या टोळीने नगर, पुण्यातही अनेकांना गंडा घातल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. त्यामुळे कोट्यवधी कर्ज मंजुरीच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणार्‍या टोळीचा उपनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

मिलिंद मेश्राम (रा. पुणे), नितीन हासे (रा. संगमनेर, जि.नगर), बंटी मेडके (रा. नागपूर), सागर वैरागर (रा. सोनई, ता. नेसावा, जि. नगर), प्रणव राजहंस, भूषण बाळदे (दोघे रा. अहमदनगर) अशी टोळीतील संशयितांची नावे आहेत.
या टोळीचा मेश्राम हा सूत्रधार आहे. नाशिकमधील राकेश उत्तम बोराडे (रा. नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना नव्याने सोलर प्लांट सुरू करण्याची कर्जाची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांचा संशयितांशी संपर्क झाला.

संशयितांनी त्यांना ५ कोटी रुपयांचे राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी संशयितांनी त्यांच्याकडून १० लाखांची रक्कम घेतली. संशयितांनी बोराडे यांच्याकडून कागदपत्रे घेत नाशिक रोड परिसरातील राष्ट्रीयकृत बँकेचा कर्ज मंजूर झाल्याचा डीडी त्यांना दिला. बोराडे तो कर्जाचा डीडी घेऊन संबंधित बँकेत गेले असता, बँकेने सदरचा डीडी बनावट असल्याचे सांगितल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे समोर आले. संशयितांना त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्नही केला. याप्रकरणी त्यांनी उपनगर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी मिलिंद मेश्राम (रा. पुणे), नितीन हासे (रा. संगमनेर, जि. नगर), बंटी मेडके (रा. नागपूर), सागर वैरागर (रा. सोनई, ता. नेसावा, जि. नगर) या चौघांना अटक केली आहे, तर प्रणव राजहंस, भूषण बाळदे हे दोघे पसार असून त्यांच्या मागावर उपनगर पोलिसांची पथके आहेत. सदरील गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक सचिन चौधरी हे करीत आहेत.

या संशयित टोळीने नाशिकसह नगर आणि पुण्यातही अशाच रितीने अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. उपनगर पोलिसांच्या प्राथमिक तपासातून नगर जिल्ह्यातील शिर्डीतही काहींना या संशयितांच्या टोळीने गंडा घातल्याचे समोर आले आहे. अद्यापपर्यंत पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार नसली तरीही लवकरच या टोळीविरोधात संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या मिलिंद मेश्राम (रा. पुणे), सागर वैरागर (रा. सोनई, ता. नेसावा, जि. नगर) यांच्या पोलीस कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे. नितीन हासे, बंटी मेडके (रा. नागपूर) या दोघांची नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.