नाशिक जिल्ह्यात 100 टक्के कोरोना लसीकरण

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा आकडा शंभर टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य विभागाने केलेल्या या कामगिरीला स्वदेस फाऊंडेशन या संस्थेची साथ लाभल्याबद्दल आरोग्य विभागातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
ग्रामीण भागामध्ये कोरोना लसीकरण करण्यासाठी मनुष्यबळ व साधन साहित्य तसेच रुग्णवाहिका ‘स्वदेस’ने उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे फिरते लसीकरण केंद्र प्रस्थापित करता आले.

लसीकरणापासून वंचित राहिलेले भागांमध्ये जाऊन रात्री व लोकांच्या सोयीनुसार लसीकरणाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्याचे कोरोना लसीकरण जास्तीत जास्त होण्यासाठी नोव्हेंबर 2021 ते मे 2022 या कालावधीपर्यंत जिल्हा प्रशासनाला केलेल्या सहकार्य बद्दल स्वदेस फाउंडेशन व त्यांच्या सर्व टीमचे जिल्हा प्रशासनामार्फत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लसीकरण घटना व्यवस्थापक तथा भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये तसेच स्वदेस फाउंडेशनचे तुषार इनामदार, नीता हरमलकर, डॉ. सचिन आहिरे यांच्यासह या कार्यक्रमात काम करणार्‍या नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर आणि ड्रायव्हर आदी कर्मचार्‍यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हा व्यवस्थापक डॉ. सचिन आहिरे यांनी विशेष प्रयत्न केले.