आजपासून बारावीची परीक्षा; जिल्ह्यात १०८ केंद्रांवर ७४ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवार (दि. 21)पासून बारावीची परीक्षा सुरु होत आहेत. नाशिक जिल्ह्यात 108 केंद्रांवर 74 हजार 780 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी 8 भरारी पथके तयार करण्यात आले आहे. परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना परीक्षार्थींना देण्यात आल्या आहेत. सकाळ सत्रात 10.30 तर दुपार सत्रात 2.30 वाजता परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रश्नपत्रिकांचे वितरण सकाळी 11 वाजता होणार आहे.

दहावी व बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय मंडळातर्फे आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेला यंदा राज्यभरात 14 लाख 57 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहेत. त्यात 7 लाख 92 हजार विद्यार्थी व 6 लाख 64 हजार विद्यार्थिनी यांचा समावेश आहे. राज्यभरात 3 हजार 195 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वाधिक विद्यार्थी विज्ञान शाखेसाठी प्रविष्ठ होणार आहेत. कृती आराखड्याद्वारे यंदा परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत सर्वसाधारण व द्विलक्षी विषय आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम यांची परीक्षा होईल. बारावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागात यंदा एक लाख 62 हजार 612 परीक्षार्थी प्रविष्ठ होणार आहेत.

समुपदेशक व हेल्पलाइनची सुविधा उपलब्ध

बारावी परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थी मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी राज्य मंडळाने दहा समुपदेशकांची नियुक्ती केली असून, विभागीयस्तरावर जिल्हानिहाय दोन समुपदेशक असतील. नाशिकमध्ये किरण बावा मो. 9423184141 तर अरुण जायभावे मो. 8668579097 हे समुपदेशक विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करणार आहेत. तसेच नाशिकसह राज्यातील 9 विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.