आठ महिन्यांत १३० दुचाकींची चोरी

संगमनेर : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आठ महिन्यात सुमारे १३० दुचाकी चोरून चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, पोलीस तपासात १३० दुचाकींपैकी अवघ्या १६ दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे संगमनेर शहरात दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या दुचाकीचोरीच्या घटनांमुळे वाहनचालक व मालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी वाहनचालक करत आहेत.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही गावांमधून आणि संगमनेर शहरातील खासगी हॉस्पिटलच्या पार्किंग, बसस्थानक परिसर आदी ठिकाणांहून चोरट्यांनी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात जवळपास १३० दुचाकी चोरून पोबारा केल्या आहेत. मोठ्या प्रमाणात दुचाकींची चोरी होवूनही अवघ्या १६ दुचाकींचा शोध पोलिसांना लावता आला आहे. ऑगस्ट महिन्यात दुचाकीचोरांनी धुमाकूळ घातला आहे. शहरातून दिवसाआड दुचाकींची चोरी होत आहे. मात्र, याकडे पोलिसाचे दुर्लक्ष असल्याचे पाहावयास मिळत आहे. संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणात दुचाकींची चोरी होवूनही संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह इतर पोलीस नेमकी करतायत तरी काय, असा प्रश्नही वाहनचालकांना पडला आहे.

अशी आहे मोडस ऑपरेंडी

अनेक दुचाकीचालक कामानिमित्त संगमनेरात येतात. मात्र, हे चोरट दुचाकींवर नजर ठेवून असतात. दुचाकीचालक नजरेआड झाले की लगेच चोरटे ती दुचाकी चोरून पोबारा करत आहेत, अशा पद्धतीने आठ महिन्यात जवळपास १३० दुचाकी चोरून चोरट्यांनी पोबारा केला आहे. त्यामुळे दुचाकीचोरांचे रॅकेट शहरात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.

संगमनेरला गरज खमक्या पोलीस निरीक्षकांची

संगमनेर शहरातील एटीएम मशीन फोडून चोरट्यांनी लाखो रूपयांची रोकड चोरून नेली. त्याचबरोबर संगमनेर बसस्थानकातून महिलांचे सोन्याचे दागिने ओरबाडण्याचे सत्र सुरूच आहे. तरीही चोरट्यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले नाही. तसेच अनेक बंद घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी मोठा ऐवज चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता खर्‍या अर्थाने संगमनेर शहर पोलीस ठाण्याला खमक्या पोलीस निरीक्षकांची गरज असल्याचे नागरिक म्हणत आहेत.