घरताज्या घडामोडीमालेगावी वैद्यकीय अधिकार्‍यासह १४ जणांना करोना

मालेगावी वैद्यकीय अधिकार्‍यासह १४ जणांना करोना

Subscribe

रुग्णांचा आकडा ११० वर; २०५ रिपोर्ट प्रलंबित

मालेगावात करोनाचे थैमान सुरूच असून, गुरुवारी (दि.2३) दिवसभरात महापालिका वैद्यकीय अधिकार्‍यासह १४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, करोनाबाधित वैद्यकीय अधिकारी मालेगावातील प्रशासनाच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहिल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे. मालेगावातील करोनाबाधितांची संख्या ११० झाली असून, जिल्ह्यातील बाधितांची संख्या १२४ झाली आहेत.

मुंबई, ठाणे आणि पुणे या तीन जिल्ह्यांनंतर करोना पॉझिटिव्ह रुग्णांचे शतक पूर्ण करणारा नाशिक हा राज्यातील चौथा जिल्हा ठरला आहे. मालेगावने करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत शतक पार केले असून, राज्यातील हा पहिलाच तालुका आहे. करोनाग्रस्त देशातून नाशिक जिल्ह्यात आलेले व आजपर्यंत करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिक एक हजार ८६३ आहेत. गुरुवारी (दि.२३) २१ संशयित रुग्ण दाखल झाले असून, ३६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एक हजार ३४ संशयित रुग्णांच्या घशाचे नमुने तपासण्यात आले आहे. त्यातील २०५ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

- Advertisement -

गुरुवारी दिवसभरात मालेगावात आणखी १४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात मालेगाव महापालिकेच्या वैद्यकीय अधिकार्‍याचा समावेश आहे. त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयातील करोना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबियांनादेखील क्वारंटाईन करण्यात आले. विशेष म्हणजे या करोनाबाधित वैद्यकीय अधिकार्‍याने मालेगावातील प्रत्येक प्रशासकीय बैठकीला हजेरी लावल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकार्‍यांना क्वारंटाईन करण्यासह करोना तपासणी करावी लागणार आहे.

शेकडो परप्रांतीय कामगार ताब्यात

नाशिक शहरातील मुंबई-आग्रा उड्डाणपुलावरुन गुरुवारी दुपारी शेकडो परप्रांतीय कामगार मुंबईहून आपआपल्या गावी जाण्यासाठी पायी निघाले होते. ते उड्डाणपुलावरुन जात असल्याचे मुंबईनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांसह परप्रांतीय कामगारांना ताब्यात घेतले. त्यांना आनंदवली येथील निवाराशेडमध्ये पाठविले आहे.

- Advertisement -

नाशिक करोना अहवाल

पॉझिटिव्ह रुग्ण – १२४
मालेगाव – ११० (मृत ०९)
नाशिक शहर १० (बरा झालेला रुग्ण ०१)
नाशिक जिल्हा ०४ (बरा झालेला रुग्ण ०१)
निगेटिव्ह रुग्ण ७०५
गुरुवारी दाखल झालेले रुग्ण २१
जिल्हा रुग्णालय ०४
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय ०३
मालेगाव रुग्णालय १४

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -