नाशिक शहरात १४५० कोरोना उच्चांकी रुग्णवाढ, ५०५८ अहवाल प्रलंबित

नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत ६३२५ सक्रिय रुग्ण

corona

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयितांनी कोरोना टेस्ट करुन घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे केले जात आहे. त्यास नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील ५ हजार ५८ संशयित रुग्णांनी कोरोना टेस्ट केली असून, त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. यामध्ये नाशिक शहर १ हजार ३३५, नाशिक ग्रामीण ३ हजार ५८३, मालेगावमधील १४० संशयित रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून, दररोज उच्चांकी रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मंगळवारी (दि.११) दिवसभरात उच्चांकी १ हजार ४५० नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये नाशिक शहर १ हजार ३८, नाशिक ग्रामीण ३५०, मालेगाव १४ आणि जिल्ह्याबाहेरील ४८ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात ६ हजार ३२५ सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये नाशिक शहर ४ हजार ८९६, नाशिक ग्रामीण १ हजार १३१, मालेगाव ६५ आणि जिल्ह्याबाहेरील २३३ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. दिवसभरात ४६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सुदैवाने दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत ४०३ ने वाढ झाली आहे. तर, ८९१ ने सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यात ४ लाख २१ हजार २९४ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ४ लाख ६ हजार २०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

अवघे ७६ बाधित रुग्णालयात

दिवसभरात १ हजार ४५० रुग्ण बाधित आढळून आले असले तरी अवघे ७६ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल झाले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालय ३, नाशिक महापालिका रुग्णालय ४१, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय १, मालेगाव रुग्णालय १४ आणि नाशिक ग्रामीण रुग्णालयात १७ रुग्ण दाखल झाले आहेत.