दहावीच्या परीक्षेला पहिल्या दिवशी १६०७ जणांची दांडी

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या लेखी परीक्षेला गुरुवार (दि. २) पासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी नाशिक जिल्ह्यात १ हजार ६०७ विद्यार्थी गैरहजर राहिले. मात्र, पहिल्याच दिवशी मराठी पेपर वर्षभर चांगला अभ्यास केल्याने सोपा गेला. सोपे प्रश्न असल्याने उत्तरे अचूक लिहिता आली, अशी प्रतिक्रिया दहावीच्या परीक्षेला पहिल्यांदाच सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा पहिला पेपर गुरुवारी असल्याने शहरातील विविध केंद्रांवर पालकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. काही विद्यार्थ्यांचे आई-वडील परीक्षा केंद्रापर्यंत आले होते. परीक्षा केंद्रांवर पहिल्या सत्रात मराठी पेपरला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. केंद्रातून मुलेमुली बाहेर येईपर्यंत त्यांचे पालक बाहेर दिसून आले. शहरासह जिल्ह्यात सर्व केंद्रांवर मराठीचा पेपर शांततेत पार पाडला. विद्यार्थी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी केंद्राबाहेर येताच पालकांनी त्यांचे आनंदाने स्वागत केले. पालकांनी पेपर कसा गेला हे विचारण्यापूर्वीच मुलांनी पेपर सोपा गेल्याचे सांगत होते. सोमवारी (दि.६) इंग्रजीचा पेपर होणार असून, अभ्यासाठी विद्यार्थ्यांना चार दिवसांचा वेळ आहे. त्यामुळे विद्यार्थ्यी तणावमुक्त असल्याचे दिसून आले. बारावीप्रमाणेच दहावीच्या परीक्षेतही गैरप्रकार टाळण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविले जाणार आहे. परीक्षेच्या काळात ताणतणाव जाणवल्यास नाशिक जिल्ह्यातील परीक्षार्थींनी किरण बावा यांच्याशी 9423184141 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.