घरमहाराष्ट्रनाशिकगंगापूर ८० टक्के भरले; गोदावरीला पूर

गंगापूर ८० टक्के भरले; गोदावरीला पूर

Subscribe

धरणांतून विसर्ग : नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

गत तीन दिवसांपासून नाशिक आणि पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरण ८० टक्के भरले आहे. त्यामुळे दुपारी दोन वाजेपासून जलसंपदा विभागाने गंगापूर धरणातून १ हजार क्युसेक विसर्ग करण्यास सुरूवात केली. सायंकाळी ६ वाजेनंतर हा विसर्ग ६ हजार ५१० क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला. होळकर पुलाखालून गोदापात्रात ६ हजार २९७ क्युसेक पाणी गोदावरीत प्रवाहित होणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे. गोदाकाठी असलेल्या रहिवाशांना तसेच विक्रेत्यांना तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आदेश दिले आहेत. तसेच गोदाकाठालगत सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. धरणातील पाण्याबरोबरच आजूबाजूच्या परिसरातील धरणात न जाणारे पाणीही गोदावरीत येऊन मिसळत असल्याने गोदेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचवटीतील रामकुंड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पारंपरिक परिमाण असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागले. गोदावरी व दारणा नदी काठावरच्या घरे गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता झालेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ४२.७३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

- Advertisement -

नाशिकचा पूर बघण्यासाठी येथे करा क्लिक

इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. वाढत्या पाणी पातळीमुळे नागरिकांनी तत्काळ गोदापात्रापासून सुरक्षितस्थळी निघून जावे, आपली दुकाने, वाहने गोदापात्रापासून तत्काळ काढून घ्यावी, असे आवाहन महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनामार्फत करण्यात आले आहे. पूर पाहण्यासाठी वा फोटो काढण्यासाठी कोणीही पुलांवर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे. पंचवटी, भद्रकाली, सरकारवाडा या तीनही पोलीस ठाण्यांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त घारपुरे घाट ते तपोवनापर्यंत नदीकाठालगत व पुलांवर ठेवण्यात आला आहे. सोमवारी दिवसभरात धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. यात गंगापूर क्षेत्रात ६९ मिमी, काश्यपी ६४ मिमी, अंबोली १०० मिमी पावसाची नोंद झाली.

धरणांतील विसर्ग (क्युसेक)

  • गंगापूर ६५१०
  • दारणा १३०५८
  • कडवा १०९९८
  • पालखेड ५०००
  • नांदुर मध्यमेश्वर ५४८४५

खबदारीच्या सूचना 

गंगापूर धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदेच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या रहिवाशांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. पुरग्रस्त भागातून वाहने चालवू नये. नदीप्रवाहाच्या पाण्यात उतरू नये. पुलाचे पाणी पुलावरून वाहत असल्यास पुलावरून प्रवास करू नये, अशा सूचना नाशिक जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.

सोमवारचा पाऊस (सकाळ ८ ते सायंकाळी ५)  तालुका पाऊस (मि.मी.)

  • नाशिक २०
  • इगतपुरी ४९
  • त्र्यंबकेश्वर ६८
  • दिंडोरी २५
  • पेठ ६४
  • निफाड १०.२
  • सिन्नर १३
  • चांदवड ३
  • देवळा ३
  • नांदगाव ३
  • मालेगाव ३
  • बागलाण २४
  • कळवण १०
  • सुरगाणा ९६

धरणसाठा (टक्के)

  • गंगापूर ८०,
  • कश्यपी ५१,
  • गौतमी गोदावरी ६३
  • आळंदी ८२
  • पालखेड ७०
  • करंजवण २७
  • वाघाड ४५
  • ओझरखेड ५
  • पुणेगाव ११
  • दारणा ८७
  • भावली १००
  • मुकणे ४३
  • वालदेवी ८९
  • कडवा ९०
  • भोजापूर २४
  • चणकापूर २५
  • हरणबारी २७
  • केळझर ५
  • गिरणा ८
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -