शहरातील २१९ हॉस्पिटल फायर ऑडीटविनाच

 नाशिक : आगीसारखी एखादी दुर्घटना घडून त्यात जिवीत आणि वित्तहानी होऊ नये, यासाठी १५ मीटरच्या पुढे उंची असलेल्या प्रत्येक इमारतीचे फायर आॉडीट करून घेण्याचे राज्य शासनाचे निर्देश आहेत. असे असताना नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून गेल्या पाच महिन्यांपासून केवळ नोटीस देण्याचेच काम सुरू आहे. शहरातील ६०७ पैकी २१९ हॉस्पिटल अजुनही फायर आॉडीटविनाच सुरू असल्याची बाब समोर आली आहे.

मुंबई, ठाणे, पुणे तसेच नगर येथील काही खासगी आणि शासकीय रूग्णालयांना आग लागून दुर्घटना घडली होती. त्याचबरोबर इतरही राज्यात अशा प्रकारच्या घटना घडल्याने त्यापासून धडा घेण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश देत रहिवाशी, व्यावसायिक तसेच हॉस्पिटलचे फायर आॉडीट करून घेण्यास सांगितले होते. अर्थात, या आदेशानंतरही नाशिक मनपाच्या अग्निशमन विभागाने केवळ नोटीस बजावण्याचे काम तेही जाहीर प्रसिध्दीच्या माध्यमातून पूर्ण केले आहे. अशा प्रकारची कारवाई या विभागाकडून दरवर्षी केली जाते. मात्र फायर आॉडीट झाले की नाही याबाबत कोणतीही खातरजमा केली जात नाही. त्यामुळेच आगीसारख्या दुर्घटना घडतात. परंतु, अग्निप्रतिबंधक उपाययोजना नसल्याने त्यात जिवीत तसेच वित्तहानीला सामोरे जावे लागते.

१५ मीटर व त्यापेक्षा अधिक उंची असलेल्या व्यावसायिक, रहिवाशी आणि हॉस्पिटल व्यवस्थापनाने फायर आॉडीट करणे बंधनकारक आहे. त्यानुसार नाशिक मनपाच्या अग्निशमन विभागाने शहरात ६०७ हॉस्पिटल असल्याचा दावा केला असून, त्यापैकी ३८८ हॉस्पिटल्सने फायर आॉडीट केले असून, अद्याप २१९ ठिकाणचे आॉडीट झालेले नसल्याचे सांगितले आहे.
फायर आॉडीट न करणार्‍या इमारती, आस्थापनांचे नळकनेक्शन तसेच वीज कनेक्शन तोडले जाते. परंतु, अग्निशमन विभागाकडून मात्र फायर आॉडीट न करणार्‍या आस्थापनांना पाठीशी घातले जात असल्यानेच वर्षानुवर्ष आॉडीट न करताच केवळ नोटीसचा फार्स उभा केला जात असल्याचे चित्र दिसून येते.

 

शहरातील एकूण हॉस्पिटल्स : ६०७, एकूण निकाली हॉस्पिटल्स : ३८८, एकूण शिल्लक हॉस्पिटल्स २१९ 

 

हॉस्पिटल्सचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, इतर व्यावसायिक व रहिवाशी इमारतींच्या सोसायट्या, अपार्टमेंट यांना नोटीस देण्याचे काम सुरू आहे. तीन वेळा नोटीस देऊनही आॉडीट न करणार्‍या इमारतींवर कारवाई केली जाते. आता अंतिम नोटीस देण्याचे काम सुरू आहे : संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी