घरमहाराष्ट्रनाशिकशहरातील २३ गणेश मंडळांना परवानगी नाकारली

शहरातील २३ गणेश मंडळांना परवानगी नाकारली

Subscribe

शांतता समिती बैठकीत पदाधिकार्‍यांची नाराजी, पोलिसांकडून समजूत घालण्याचा प्रयत्न

रस्त्यालगत मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करणार्‍या शहरातील सुमारे २३ गणेश मंडळांना परवानगी नाकारण्यात आल्याने पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या शांतता समिती बैठकीत मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी नाराजी दर्शवली. जर मंडळांना न्याय मिळू शकत नसेल तर अध्यक्षपदाचा तरी काय उपयोग असा पवित्रा घेत नाशिक शहर गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष समीर शेटे यांनी थेट राजीनामा घेण्याचा पवित्रा घेतला. यानंतर पोलीस आयुक्तांनी पर्यायी मार्ग काढण्याचे आश्वासन देत समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

पोलीस आयुक्तालयात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत मंडळांना परवानगी देण्याच्या विषयावर चांगलीच खडाजंगी झाली. सार्वजनिक गणेश मंडळांची उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्त्याची लांबी-रूंदी आणि मंडपाचा आकार तसेच अन्य अटी-नियम लागू केले आहेत. त्याचे उल्लंघन होत असल्याच्या पोलिसांनी शहरातील सुमारे २६ मंडळांना परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येउन ठेपला असतांना कार्यकर्त्यांना परवानगीच्या क्लिष्ट प्रक्रियेतून जावे लागत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सुटसुटीत आणि तत्काळ मार्गी लागणारी असावी, अशी मागणी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. जर गणेश मंडळांना उत्सव साजरे करण्यासाठी परवानगीच मिळत नसेल तर मग बैठकही कशासाठी असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावेळी गणेश मंडळांचे अध्यक्ष समीर शेटे यांच्याही मंडळाला परवानगी नाकारल्याने जर आपल्याच मंडळाला परवानगी मिळत नसेल तर मग इतर मंडळांना तरी कसा न्याय देणार असा प्रश्न उपस्थित करत थेट बैठकीतच राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला मात्र याबाबत पर्यायी मार्ग काढला जाईल असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिल्याने हा वाद तुर्तास तरी शमला आहे. यावेळी नांगरे पाटील यांनी उपस्थित मंडळांचे पदाधिकारी व शांतता समितीच्या सदस्यांकडून आलेल्या सुचनांची निश्चित दखल घेतली जाईल असे आश्वासन दिले.

- Advertisement -

ज्या मंडळांना वाहतूक शाखेकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही त्यांनाही लवकरात लवकर परवानगी दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणराय बुध्दीची देवता असून आपण सगळे विघ्नहर्ता म्हणून ‘श्रीं’चे पूजन करतो. त्यामुळे प्रत्येक मंडळाने त्याचे भान ठेवत या उत्सवाचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करावा आणि कायदासुव्यवस्थेचे पालन करत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करत सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत उत्साहात साजरा करावा असे आवाहन केले. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातील प्रत्येक लहान मोठ्या मंडळांचीदेखील जबाबदारी असून प्रत्येक मंडळाचा कार्यकर्ता साध्या वेशातील पोलीस आहे, हे विसरु नये, असे मत विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केले.

या बैठकीला महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, योगेश घोलप, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, भक्तीचरणदास महाराज, गणेश महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, सुहास फरांदे, माजी महापौर अशोक दिवे, अशोक मुर्तडक, उपआयुक्त अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौगुले आदि मान्यवर उपस्थित होते.तसेच मंडळाचे पदाधिकारी रामसिंग बावरी, गजानन शेलार, शंकरराव बर्वे, देवांग जानी, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, नगरसेवक सलीम शेख, वत्सला खैरे, आशा तडवी, अशोक पंजाबी, अवधुत कुलकर्णी, पद्माकर पाटील, मंडलेश्वर काळे, निशीकांत पगारे, डॉ. मनिषा रौंदळ यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

करमुक्त गणेशोत्सव व्हावा

गणेश मंडळांकडून मंडप उभारणीसाठी महापालिकेकडून भाडे आकारले जाते. गणेशोत्सव काळात मंडळांच्या माध्यमातून केल्या जाणारया जाहीरातींवरही करमणूक कर आकारला जातो त्यामुळे भाडे आकारल्यानंतर करमणूक कर आकारू नये अशी मागणी करत करमुक्त गणेशोत्सव व्हावा अशी मागणी गणेश मंडळांनी यावेळी केली.

सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले

अद्यापपर्यंत २६ गणेश मंडळांना पोलीस विभागाने परवानगी दिलेली नाही. शहरात दरवर्षी सुमारे ८०० गणेश मंडळांकडून परवानगी मागितली जाते आता मंडळांची संख्याही दिवसेंदिवस कमी हात आहे सध्या तरी ५०० ते ६०० मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत. ज्या मंडळांना परवानगी नाकारण्यात आली त्यांच्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. – समीर शेटे, अध्यक्ष, सार्वजनिक गणेश मंडळ समिती

मंडळांच्या सूचना

  • डीजे व डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करावा.
  • देखावे बघण्यासाठी येणारया महिला, तरूणींच्या सुरक्षेकडे स्वयंसेवकांनी लक्ष द्यावे.
  • विसर्जन मिरवणूकीत सहभागी मंडळांनी अंतर पडू देऊ नये
  • मिरवणूक दुपारी १२ वाजता पारंपरिक पध्दतीने सुरू करण्यास प्रयत्नशील रहावे.
  • गणेशोत्सवात हेल्मेटसक्तीचा नियम पुर्णत: शिथील करावा
  • दहा वाजेनंतर देखावे खुले ठेवण्यास परवानगी द्यावी.
  • मिरवणूकीत सहभागी मंडळांनी पंचवटी कारंंजापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करावा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -