कंटेनर – कारची भीषण धडक, अपघातात ३ ठार

दुचाकीला वाचवताना झाला अपघात

नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या भरधाव कंटेनरने बुधवारी (दि.२१) दुपारी दुचाकीचालकाला वाचवण्याच्या नादात दुभाजक ओलांडून कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारचालकाला कारवर नियंत्रण मिळवता आले नाही. कार पलटी झाल्याने कारमधील तिघे जागीच ठार झाले असून, दोघे जखमी झाले आहेत. मृत व्यक्ती हे जुन्या नाशिकमधील रहिवासी असल्याचे समजते.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबई-महामार्ग महामार्गावर वाडीवर्‍हे फाट्यावर नाशिककडून मुंबईकडे कंटेनर जात होता. कंटेनरचालकाने एका दुचाकीचालकाला वाचवण्याच्या नादात कंटेनर उजव्या बाजूस वळवला. त्यात कंटेनर दुभाजक ओलांडून मुंबईहून नाशिककडे येणार्‍या लेनमध्ये पलटी झाला. त्याचवेळेस मुंबईहून नाशिककडे येणार्‍या कारवर कंटेनर जाऊन आदळला. या भीषण अपघातात कारमधील तिघे जागीच ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले. ही बाब वाडीवर्‍हे पोलिसांना समजताच ते घटनास्थळी आले. यावेळी कारमध्ये दोन जखमी प्रवाशी अडकले होते. पोलिसांनी त्यांना बाहेर काढले. पोलिसांनी सुरुवातीला जखमींना उपचारार्थ नरेंद्रचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत केली.