घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशहरातून १५ दिवसांत ३४ दुचाकी लंपास; चोर जोमात आणि पोलिस...

शहरातून १५ दिवसांत ३४ दुचाकी लंपास; चोर जोमात आणि पोलिस…

Subscribe

अंबड, गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत सर्वाधिक घटना; वाहनधारकांची वाढतेय डोकेदुखी

साईप्रसाद पाटील । नाशिक

३४ पैकी १६ दुचाकींची दिवसा चोरी

पोलीस दप्तरी नोंद असलेल्या वाहनचोरीच्या घटनांमध्ये ३४ पअकी १६ दुचाकी या दिवसा चोरीला गेल्याचे धक्कादायक चित्र दिसते. काही दुचाकी हॅण्डल लॉक केलेल्या नसल्याने त्या बनावट चाव्यांद्वारे चोरट्यांनी लंपास केल्याचे सांगण्यात आले. तर अनेक जुन्या दुचाकी हॅण्डल लॉक तोडून लंपास केल्याचे दिसून येते. दुचाकी चोरट्यांना पोलिसांचा धाकच नसल्याचे या घटनांवरून अधोरेखित होते.

नाशिक : शहरातील दुचाकी चोरट्यांनी टॉप गिअर टाकल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. एकीकडे गुन्हेगारी घटनांत वाढ होत असताना आता दुचाकी चोरीच्या घटना कमालीच्या वाढल्याने वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. नाशिक शहरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या १५ दिवसांत ३४ दुचाकी चोरीला गेल्या आहेत. म्हणजेच दिवसाला दोन दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार घडत असताना आता पोलीस गस्त वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

- Advertisement -

नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील अंबड आणि गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत दुचाकी चोरीच्या सर्वाधिक घटना घडल्याचे दिसून येते. वेगवेगळ्या शक्कल लढवून चोरट्यांकडून थेट रहिवासी इमारतींच्या पार्किंगमधूनही दुचाकी चोरल्या जात असल्याने आता पोलीस यंत्रणेपुढे आव्हान उभे ठाकले आहे. १ जुलैपासून १५ जुलैपर्यंत घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दिवसा दुचाकी चोरीस गेल्याच्याही घटना दिसून येतात. यामुळे वाहनधारकांना कुठल्याही भागात वाहने उभी करताना ते सुरक्षित राहील की नाही, याविषयी प्रश्न पडत असल्याचे बोलले जातेय. १२ जुलैपासून चोरट्यांनी टॉप गिअर टाकल्याचे दिसून येते. या दिवशी पंचवटीसह आडगाव, भद्रकाली आणि सरकारवाडा पोलीस ठाणे अशा चार हद्दीत दुचाकी चोरीला गेल्याची नोंद आहे. १३ जुलैला पंचवटीसह सरकारवाडा हद्दीत दोन दुचाकी लंपास झाल्या. तर पुन्हा १४ जुलैला अंबड, गंगापूर, मुंबईनाका, उपनगर हद्दीत आणि १५ जुलैला भद्रकाली, गंगापूर, मुंबईनाका, नाशिकरोड अशा चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांची नोंद झाल्याचे दिसून येते. चोर्‍यंच्या प्रमाणात कारवाईचे प्रमाण कमी असल्याने दुचाकी चोरट्यांचे धारिष्ठ्य अधिक वाढत असून, भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणहूनही वाहने चोरीस जाण्याचे प्रमाणही वाढत आहे.

रात्रीची पोलीस गस्त वाढवावी. गस्त फक्त मुख्य रस्त्याने न होता आतील रस्त्यांवर व्हावी. तेथे क्यूआर कोड बसवून त्याच्या स्कॅनिंगचा अहवाल वेळोवेळी जनतेसमोरही सादर करावा. सीसीटीव्ही अपडेट केले जावेत. पोलीस प्रशासनाला अनेक सेवाभावी संस्था, आस्थापना मदत करतात, अधिकाधिक सीसीटीव्हींसाठी पोलीस यंत्रणेने पुढाकार घ्यावा. यातून दुचाकी चोरीच नाही, तर अन्य गुन्हेही घटतील. : नविंदरसिंग अहलुवालिया

चोरट्यांकडून रात्रीच्या वेळेस वाहने चोरण्याचे प्रकार वाढत आहेत. अनेक अशी ठिकाणे आहेत, जेथे सीसीटीव्ही नाहीत. चोरट्यांकडून अशा ठिकाणीच वाहनांना टार्गेट केले जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा ठिकाणांवर पोलिसांकडून गस्त वाढवावी, तसेच इमारतीतील नागरिकांनीही पार्किंगमध्ये सीसीटीव्ही बसवावेत. जेणेकरून चोरट्यांना जरब बसेल. : योगेश कापसे

काय काळजी घ्याल ?

शहरात एकीकडे दुचाकी चोरण्याचे प्रकार वाढत असताना पोलिसांसह नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे आहे. आपली वाहने पार्क करताना हॅण्डल लॉकसह ती कोणत्या ठिकाणी उभी करतोय याचा विचार करणे गरजेचे आहे. रात्रीच्या सुमारास वाहने उभी करताना अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. वाहनांच्या सुरक्षिततेसाठी पुढील उपाययोजना केल्यास धोका टळू शकतो…

- Advertisement -
  • वाहने नेहमी डाव्या बाजूला हॅण्डल ठेवून लॉक करूनच उभे करावे
  • वाहनांच्या अधिक सुरक्षेसाठी हॅण्डल लॉकसह यू आकारातील पुढच्या शॉकअबजवळील लॉक लावावे
  • महागडे वाहन असल्यास जीपीएस यंत्रणा बसवावी, जेणेकरून वाहनाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य होईल
  • इमारतीत रात्रीच्या वेळेत वाहने उभी करताना ती सीसीटीव्हीच्या नजरेत येतील, अशाच ठिकाणी उभी करावीत, यासाठी इमारतींच्या पार्किंगमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणे अत्यंत गरजेचे आहे
  • एखाद्या ठराविक ठिकाणी चोर्‍या होत असतील, तर अशा इमारतींच्या पार्किंगमध्ये रात्रीच्या सुमारास शक्य असल्यास सर्व वाहने एकाच ठिकाणी साखळीबंद करून उभी करावीत.
  • निर्जनस्थळी वाहने उभी करू नयेत
  • वर्दळीच्या ठिकाणी वाहने उभी करताना ती योग्य स्थळीच उभी करावीत, शक्य असल्यास कुठल्याही बाजारपेठेत वाहन उभे करताना तेथेही सीसीटीव्ही असलेल्या आस्थापनांजवळ वाहन उभे करण्याचा प्रयत्न करावा
  • वाहनांची कागदपत्रे पूर्ण असावीत. जेणेकरून तपासात अडचणी येत नाहीत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -