विवाहिता मृत्यूप्रकरणी सासरच्या ४ जणांना कोठडी

मृत विवाहितेच्या नातलगांनी पतीच्या साहित्य पेटवले

चांदवड : तालुयातील काजीसांगवी येथील विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सासरच्या चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर विवाहितेच्या मृत्यूनंतर मृत विवाहितेच्या नातलगांनी विवाहितेच्या पतीच्या घरातील संसारोपयोगी साहित्य पेटवून दिल्याने याप्रकरणी चांदवड पोलिसांत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काजीसांगवी येथील विवाहिता अश्विनी सचिन ठाकरे (२२) हिचा रविवारी (दि. २४) सकाळच्या सुमारास काजीसांगवी शिवारातील शेत गट नंबर २५९/२ मधील विहीरीत मृतदेह आढळून आला होता. याबाबत कार घेण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा वारंवार शारीरीक, मानसीक छळ व मारहाण करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद विवाहितेचे वडील रामदास एकनाथ सरोदे रा. नांदुरखुर्द ता. निफाड यांनी चांदवड पोलिसांत दिल्याने पोलिसांनी सासरच्या सात जणांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला होता. त्यातील पती सचिन दिलीप ठाकरे, सासरे दिलीप ठकाजी ठाकरे, सासू जयाबाई दिलीप ठाकरे व मामे सासरे बाबुराव रेवजी शिंदे यांना अटक केली होती. त्यांना चांदवड न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान, विवाहितेच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या विवाहितेच्या नातलगांनी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पती सचिन ठाकरे यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य पेटवून दिले. त्यात घरातील सोफासेट कॉट, संसारोपयोगी साहित्य, धान्य, सोयाबीन, गहू, हरभरे, मका, घरात ठेवलेली रोकड, सोन्याचे दागिणे व टीव्हीएस कंपनीची व्हिकटर मोटारसायकल (क्र. एमएच १५ बीपी २०६६) आगीत जळून नुकसान झाले.

याबाबत मृत अश्विनी हिस पती सचिन ठाकरे यांनी मारुन टाकून विहीरीत फेकले असा संशय घेऊन विवाहितेच्या नातलगांनी रागाच्या भरात चुलते दिलीप ठाकरे यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य पेटवून दिल्याची फिर्याद भूषण गंगाधर ठाकरे रा. काजीसांगवी याने चांदवड पोलिसांत दिल्याने पोलिसांनी परसराम निवृत्ती पवार रा. नैताळे ता. निफाड, दीपक निवृत्ती भालसिंगे, लहानु शिवराम झाल्टे, संदिप निवृत्ती भालसिंगे रा. मनमाड बुरकुलवाडी, चेतन लहानु झाल्टे रा. वाघदर्डी, एक दाढीवाला इसम त्याचे समजले नाही त्याच्या बुलेटवर आर्मी नाव लिहीलेले नाव गाव माहित नाही अशा एकूण ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यातील ५ जणांना अटक केली होती. त्यांना चांदवड न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी करीत आहेत.